▪️भामरागडातील अतिदुर्गम ३१ गावांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी नवीन पेरमिल्ली उपकेंद्र सज्ज..
▪️‘लोकबिरादरी’च्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून स्वतंत्र वीजवाहिनी..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
गडचिरोली – ( इंडिया 24 न्यूज ) : दि. ७ फेब्रुवारी २०२६: भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम ३१ गावांतील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आलापल्ली विभाग अंतर्गत महावितरणकडून उभारण्यात आलेल्या पेरमिल्ली ३३/११ केव्ही उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे. या उपकेंद्रातील तीन ११ केव्ही क्षमतेच्या तीन वीजवाहिन्या व ५ एमव्हीएच्या पॉवर ट्रॉन्सफॉर्मरची महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी घेण्यात आली.
उपकेंद्राच्या चाचणी प्रसंगी चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. हरीश गजबे, अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश खांडेकर (गडचिरोली मंडल), श्री. रमेश सानप (पायाभूत आराखडा), आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. जितेंद्र वाघमारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. राजेश कंगाले, उपकार्यकारी अभियंता श्री. रमाकांत देवगडे, कनिष्ठ अभियंता रोशन मानकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
अतिदुर्गम व जंगलाने व्यापलेल्या भामरागड तालुक्यातील गावांना हेमलकसा ३३/११ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येत आहे. मात्र वीजवाहिन्यांची लांबी १०० किलोमीटरपेक्षाही अधिक असल्याने घनदाट जंगल व अनेकविध अडथळ्यांमुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येत होता. त्यामुळे महावितरणकडून पेरमिल्ली येथे नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्राचा प्रस्ताव जिल्हा नियोजन व विकास समितीकडे पाठविण्यात आला. त्यास आदिवासी उपयोजना निधीमधून मंजुरी मिळाली. महावितरणच्या नवीन पेरमिल्ली उपकेंद्रातून तीन वीजवाहिन्यांद्वारे ३१ गावांना अखंडित वीजपुरवठा होणार आहे. तसेच हेमलकसा उपकेंद्राचाही वीज भार कमी झाल्याने तालुक्यातील उर्वरित गावांनाही दर्जेदार वीज उपलब्ध होईल.
*लोकबिरादरी प्रकल्पासाठी स्वतंत्र वीजवाहिनी –* थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून स्वतंत्र ११ केव्ही वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत ही वीजवाहिनी कार्यान्वित झाली. यावेळी संचालक श्री. पवार यांनी लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली व डॉ. दिगंत आमटे यांच्याशी संवाद साधला. लोकबिरादरी प्रकल्पामध्ये डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या नेतृत्वाखाली निवासी शाळा, आरोग्य सेवा व वन्यप्राण्यांचे अनाथालय आदी प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पांना सुरळीत व विनाखंडित वीजपुरवठा करण्यासाठी भामरागड ३३/११ केव्ही उपकेंद्रातून नवीन ११ केव्ही लोकबिरादरी वीजवाहिनी उभारण्यात आली आहे.
फोटो नेम – Permilli Sub Stn Gadchiroli 07-02-2026
फोटो ओळ – भामरागड (जि. गडचिरोली) तालुक्यातील पेरमिल्ली येथील नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्राची चाचणी यशस्वी झाली. यावेळी महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता श्री. हरिश गजबे यांची उपस्थिती होती.



