आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

वाघ बिबट्यांच्या हल्ल्याना निमंत्रण कोणाचे? अवैध रेती वाहतुकीमुळे वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात ; महसूल, वन व पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

धनराज सरपाते-सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही:(इंडिया २४ न्युज)
रात्रभर धावणाऱ्या रेतीच्या ट्रॅक्टरच्या कर्णकर्कश आवाज, जंगलमार्गातून बिनधास्त वाहतूक,मग वन्यप्राण्यांनी गावांचा रस्ता धरायचा नाही तर काय करायचे? नागरिकांचा संतप्त सवाल?
सविस्तर वृत असे की, शेतात वाघ, बिबट्या, अस्वल यासारख्या हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वावर वाढून मानव- वन्यजीव संघर्षाच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. या घटना मागील कारणांचा गांभीर्याने शोध घेण्याची वेळ आली आहे. वन्यप्राणी मानवी वस्त्यांमध्ये आणि शेतशिवारात येण्यामागे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात होणारा मानवी हस्तक्षेप, जंगल परिसरातील वाढती अवैद्य वाहतूक आणि रात्रीच्या वेळी होणारा प्रचंड गोंगाट ही कारणेही तपासण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

वाघ, बिबट्या, अस्वल यांसह अनेकवन्यप्राणी नदी- नाले, जंगल आणि नैसर्गिक अधिवासाच्या परिसरात राहतात. मात्र याच परिसरातून रात्री – अपरात्री मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तालुक्यात अनेक ट्रक्टर, हायवा रेतीवाहतुकीसाठी कार्यरत असून त्याची चौकशी करण्यात यावी. यावरून एका रात्रीत किती मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असेल, याचा अंदाज येतो.

रात्रभर ट्रॅक्टरचा कर्णकर्कश आवाज, जंगलातून जाणारे वाहतुकीचे मार्ग, नदीपात्रातील उत्खनन आणि मानवी वर्दळ यामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होत आहे का? त्यांच्या हालचालीचे मार्ग बाधित होत आहेत का? त्यांना सुरक्षित अधिवास सोडून शेतशिवार किंवा गावांच्या दिशेने जाण्याची वेळ येत आहे का? या प्रश्नांची वनविभागाने शास्त्रीय पद्धतीने चौकशी करणे आवश्यक आहे.

महसूल, वन व पोलीस विभाग नेमके करतात काय?

चंद्रपूर जिल्ह्यातील एकेका तालुक्यात अनेक ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी अवैध रेती वाहतूक करीत असल्याच्या तक्रारी असताना महसूल विभाग, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाच्या यंत्रणेला याची माहिती मिळत नाही का? जंगल मार्गाने, खेड्यापाड्यातून तसेच शहरातून एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरची वाहतूक होत असताना, संबंधित विभागाचे कर्मचारी काय करतात? त्यांच्या गस्त पथकांना हा प्रकार दिसत नाही का? की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

विशेष म्हणजे, या तिन्ही विभागाची यंत्रणा ग्रामीण भागापासून शहरापर्यंत कार्यरत आहे. तरी देखील अवैद्य रेती वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण का मिळवता आले नाही? एका तालुक्यात महिन्याकाठी किमान काही ट्रॅक्टर जप्त करण्यात आली आहेत काय? जप्त केलेल्या वाहनाची संख्या किती? किती वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली? किती प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले? या सर्व बाबींचा प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी होत आहे

कर्मचाऱ्यांचे खिसे गरम होतात काय? नागरिकांचा संशय!

अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीचा एवढा मोठा प्रकार उघडपणे सुरू असल्याच्या तक्रारी असताना कारवाईचा अभाव का? संबंधित यंत्रणाकडून दुर्लक्ष होत आहे, की काही ठिकाणी आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत? कर्मचाऱ्यांचे खिसे गरम होत असल्यामुळेच या प्रकाराकडे डोळे झाक केली जात आहे काय? असे प्रश्न नागरिकाकडून उपस्थित केले जात आहेत. अर्थात, या आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे.

अवैध उत्खननाच्या ठिकाणच्या जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा!

ज्या परिसरात रेती उत्खनन व वाहतूक होत आहे, त्या क्षेत्रातील संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका तपासण्यात यावी, त्यांच्या कार्यक्षेत्रात वारंवार गैरप्रकार घडत असतील आणि तक्रारी असूनही कारवाई होत नसेल, तर जबाबदारी निश्चित करून दोषीवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.

प्रशासनाने जनतेला उत्तर द्यावे!
१. एका तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणारे अंदाजे किती ट्रॅक्टर कार्यरत आहेत?
२. मागील वर्षभरात महसूल, वन व पोलीस विभागाने किती ट्रॅक्टर जप्त केले?
३. जंगलमार्गाने होणाऱ्या अवैध रेती वाहतुकीवर कोणती कारवाई करण्यात आली?
४. रात्रीच्या वेळी संबंधित विभागाची गस्त पथके कार्यरत असतात काय?
५. अवैध उत्खननामुंळे वन्यजीवांच्या अधिवासावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे काय?
६. अवैध उत्खनन होत असलेल्या परिसरातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे काय?
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतर पंचनामे, मदत आणि आश्वासनांचा पाऊस पाडण्यापेक्षा अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी आधीच ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. अवैध उत्खनन थांबविणे, जंगल मार्गावरील बेकायदेशीर वाहतुकीवर नियंत्रण आणणे आणि संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करणे ही काळाची गरज आहे.
निसर्गाचा अधिवास उध्वस्त करून विकासाचा कोणता डंका वाजवायचा? वन्यजीवांच्या सुरक्षिततेबरोबरच मानवी जीवाचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही काय? जनतेला सर्व दिसते, मग जबाबदार यंत्रणांना का दिसत नाही? आता तरी महसूल, वन व पोलीस प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा मानव वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांना आळा घालणे कठीण होईल.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.