▪️एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर जिल्हा पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने LCB एटीएम कटिंग करून लाखो रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत राजस्थानातील जिल्ली सिरदार खान (वय 52, रा. सबलगड, ता. कामा, जि. भरतपूर) याला तेलंगणातील चिन्नुर येथून अटक केली असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी रात्री पोस्ट घुग्घुस अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र, पांढरकवडा रस्त्यावरील एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्यात आला. अज्ञात आरोपींनी या एटीएम मशिनमधून तब्बल 10,92,800/- रुपये ची रोकड चोरी केली. घटनेबाबत घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. 184/2025 कलम 305, 331 (4), 334 (1) भारतीय न्याय संहिता सन 2023 प्रमाणे नोंद करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) यांना आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले, दोन वेगवेगळ्या दिशांना पथके रवाना करण्यात आली, सलग 13 दिवस दिवस-रात्र अथक प्रयत्न करून सुमारे 900 ते 1000 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत, तांत्रिक तपास व कौशल्यपूर्ण गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. या तपासातून राजस्थानातील जिल्ली सिरदार खान यास चिन्नुर, जि. मंचेरियाल (तेलंगणा) येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला पुढील तपासासाठी घुग्घुस पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरार आरोपी साजीद खान राजुददीन, रा. भाकडॉजी, पो. स्टे. फिरोजपुर झिरका, जि. नुह, हरियाणा, शैकुल उन्नस खान, रा. सावलेर, पो. स्टे. पहाडी, जि. डिग, राजस्थान आणि काला, रा. गुमटकी, बडकली चौकी, पो. स्टे. नगीना, जि. नुह, हरियाणा यांचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, पोहया इम्रान खान, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, शशांक बादामवार, मिलिंद जांभुळे, रुषभ बारसिंगे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी पार पाडली.



