▪️आता ‘ऑफलाइन सातबारा’वरही ‘कपास किसान’ ॲपवर कापूस विक्री नोंदणी शक्य!
▪️आ. देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकऱ्यांची मोठी समस्या दूर. जिवतीतील शेतकऱ्यांसाठी दिलासा..!

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : दि. ०८ जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, दि. ०३ व ०८ आक्टोंबर रोजी सीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार आता त्यांना ऑफलाइन (हस्तलिखित) सातबारा उताऱ्याच्या आधारावर देखील ‘कपास किसान ॲप’वर कापूस विक्रीसाठी नोंदणी करण्याची परवानगी मिळाली आहे. आमदार देवराव भोंगळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलित आहे.
जिवती तालुका हा आकांक्षित, दुर्गम, डोंगराळ आणि वनजमीन असल्याने येथील शेतकऱ्यांकडे शासनामार्फत ऑनलाईन किंवा संगणकीकृत सातबारा उपलब्ध नव्हता. त्यांच्याकडे केवळ जुने, हस्तलिखित सातबारा उतारे होते. भारतीय कापूस निगम लिमिटेड (CCI) मार्फत कापूस खरेदीसाठी ‘कपास किसान ॲप’वर नोंदणी करणे बंधनकारक असल्याने आणि या ॲपमध्ये संगणकीकृत सातबाऱ्याची माहिती अनिवार्य असल्याने जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांची नोंदणी होणे अशक्य झाले होते.
या गंभीर समस्येकडे आमदार देवराव भोंगळे यांनी सरकारचे लक्ष वेधले होते. जर ही समस्या तात्काळ सोडवली नाही, तर तालुक्यातील सर्व शेतकरी कापूस विक्रीपासून वंचित राहतील, अशी भीती ही त्यांनी व्यक्त केली होती.
या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे हे मोठे नुकसान टाळण्यासाठी, ‘कपास किसान’ ॲपमध्ये ऑफलाइन सातबारा उताऱ्याने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, याकरता आमदार देवराव भोंगळे यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. दि. २३ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीवेळी त्यांनी राज्याचे पणन मंत्री ना. जयकुमारजी रावल व कृषी सचिव श्री. प्रविण दराडे यांना भेटून घेऊन मागणी लावून धरली होती.
त्यांच्या या मागणीला अखेर यश मिळाले असून, शासनाने जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑफलाइन (हस्तलिखित) सातबारा सादर करून कपास किसान ॲपवर नोंदणी करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे या तालुक्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी योजनेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



