▪️तीन राज्यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या सोमनूर त्रिवेणी संगम पर्यटनस्थळाकडे जाणारा रस्ता तातडीने बांधा; अन्यथा तीव्र जनआंदोलन.. भाकपचा इशारा

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ
सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील सोमनूर त्रिवेणी संगम हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटन व धार्मिक स्थळ असून येथे प्राचीन भगवान शिवशंकराचे मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील हजारो भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. मात्र या पवित्र पर्यटनस्थळाकडे जाणारा असरली–सोमनूर रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी यांच्या मार्गदर्शनाखाली भाकपचे सदस्य इंद्रकुमार गोगुला, देविदास लटकरी, रमेश जनगम, हरियंत कुमारी तसेच परिसरातील गावकऱ्यांनी रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची जोरदार मागणी केली आहे.
भाकपच्या शिष्टमंडळाने सांगितले की, शासन पर्यटन विकास आणि धार्मिक स्थळांच्या विकासाच्या घोषणा करत असताना तीन राज्यांतील श्रद्धाळूंचे प्रमुख केंद्र असलेल्या सोमनूर त्रिवेणी संगमाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठे खड्डे, चिखल आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे अपघाताचा धोका वाढला असून पर्यटनालाही मोठा फटका बसत आहे.
असरली–सोमनूर त्रिवेणी संगम रस्त्याचे काम तात्काळ मंजूर करून दर्जेदार डांबरीकरण सुरू करावे. अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली तीव्र जनआंदोलन, रास्ता रोको आणि उग्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल. या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी शासन व संबंधित प्रशासनाची राहील, असा कडक इशारा भाकप सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी दिला.
स्थानिक ग्रामस्थांनीही शासनाने या धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या मार्गाला प्राधान्य देऊन तातडीने काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी केली आहे.



