▪️चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील उद्योगांना सुरळीत वीजपुरवठा देण्यास महावितरण कटिबद्ध; संचालक औंढेकर यांची ग्वाही..
▪️चंद्रपूर एमआयडीसी मध्ये ११ केव्ही वीजवाहिनीच्या विभाजनाला मान्यता..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. १६ सप्टेंबर २०२६: औद्योगिक ग्राहक हा महावितरणच्या महसूलाचा मुख्य कणा आहे. वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे कोणत्याही उद्योगाला फटका बसू नये हीच महावितरणची प्राथमिकता आहे. उद्योजकांना तत्पर आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असून त्यासाठी क्षेत्रीय कामकाजात अधिक सुसूत्रता व सुलभता आणली जाईल, अशी ग्वाही महावितरणचे संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी दिली.
दरम्यान, यावेळी चंद्रपूर एमआयडीसी संघटनेच्या मागणीची तात्काळ दखल घेत संचालक श्री. औंढेकर यांनी चंद्रपूर एमआयडीसीमधील ३३/११ केव्ही उपकेंद्रातील ११ केव्ही वीजवाहिनीचे विभाजन करून दोन वीजवाहिन्यांद्वारे सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करण्याचा प्रस्ताव मान्य केला. मंजुरीसाठी हा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
चंद्रपूर येथील परिमंडल कार्यालयात शनिवारी (दि. १२) आयोजित बैठकीत चंद्रपूर व गडचिरोली एमआयडीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी थेट संवाद साधला. या बैठकीत त्यांनी उद्योजकांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या आणि त्याच्या तात्काळ निराकरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी मुख्य अभियंता श्री. हरिश गजबे, अधीक्षक अभियंता श्री. मनोज धाबर्डे (चंद्रपूर) व श्री. प्रकाश खांडेकर (गडचिरोली), श्री. रमेश सानप (इन्फ्रा), एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मधुसूदन रूंगटा (चंद्रपूर) आणि श्री. अतुल बोमनवार (गडचिरोली) यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. औंढेकर पुढे म्हणाले की, औद्योगिक ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा यासाठी स्थानिक वीजयंत्रणेच्या आवश्यक सक्षमीकरणाची कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर राहील. राज्यातील सौर ऊर्जा क्रांतीमुळे औद्योगिक ग्राहकांवरील क्रॉस सबसिडीचा बोझा कमी झाल्याने तसेच वीज खरेदीमध्ये मोठी बचत सुरू असल्याने औद्योगिक व व्यावसायिक वीज दर कमी होत जाणार आहे. तसेच सौर ऊर्जेमुळे दिवसा घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना वीजदरात सवलत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या संवाद कार्यक्रमात चंद्रपूर व गडचिरोली एमआयडीसीमधील औद्योगिक ग्राहकांच्या विविध मागण्या व अपेक्षांवर चर्चा झाली. संचालक (संचालन) श्री. औंढेकर यांनी स्थानिक वीजप्रश्नांचे तातडीने निराकरण करण्याची सूचना केली. या बैठकीला चंद्रपूर व गडचिरोली एमआयडीसी औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकारी अभियंता सुहास पडोळे (चंद्रपूर), महेशचंद्र तेलंग (बल्लारशाह), विलास नवघरे (वरोरा), हितेश पारेख (गडचिरोली), जितेंद्र वाघमारे (आलापल्ली), भारतभूषण औघड (ब्रह्मपुरी) यांच्यासह अभियंते व अधिकारी उपस्थित होते.
फोटो नेम – MIDC Meeting Chandrpur-Gadchiroli – 16-09-2026
फोटो ओळ – चंद्रपूर व गडचिरोली एमआयडीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत महावितरणचे संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी चंद्रपूर येथे संवाद साधला. यावेळी मुख्य अभियंता श्री. हरिश गजबे, संघटनेचे अध्यक्ष श्री. मधुसूदन रूंगटा (चंद्रपूर) आणि श्री. अतुल बोमनवार (गडचिरोली) उपस्थित होते.



