▪️आजारी गायीवर तातडीने उपचार; पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या तत्परतेने ‘गौमाते’ला मिळाले जीवदान..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ
चामोर्शी : ( इंडिया 24 न्युज ) – शिवाजी चौक परिसरात एका गायीने काहीतरी खाल्ल्यामुळे तिची प्रकृती अचानक गंभीर झाल्याची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे चामोर्शी तालुका प्रसिद्धी प्रमुख सुरज नैताम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पशुवैद्यकीय मदतीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या उपचारामुळे गायीला जीवदान मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२ ते १ वाजताच्या दरम्यान विकास वासेकर यांनी सुरज नैताम यांना फोन करून शिवाजी चौक, वाळवंटी परिसरात एक गाय काहीतरी खाल्ल्याने अत्यवस्थ असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सुरज नैताम हे आपल्या आई-वडिलांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले.
गायीची अवस्था गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टर आकाश यांच्याशी संपर्क साधून तातडीने घटनास्थळी येण्याची विनंती केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी विलंब न करता घटनास्थळी पोहोचून गायीवर उपचार सुरू केले. सलाईन व आवश्यक इंजेक्शन देऊन उपचार करण्यात आले. उपचारानंतर गायीच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
यावेळी बोलताना सुरज नैताम म्हणाले, “सामाजिक कार्य असो किंवा राजकारण, गरजू व्यक्ती अथवा मुक्या प्राण्याला मदतीची गरज असताना आपण तत्परतेने धावून जाणे महत्त्वाचे आहे. मी पैशाने गरीब असलो तरी चालेल; मात्र एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी मदतीला धावून जाण्याची वृत्ती कायम ठेवणार आहे. प्रत्येकाने आपल्या परीने सामाजिक कार्य करत राहावे. गरजेच्या वेळी पैसा नेहमीच कामी येईल असे नाही; मात्र माणुसकीची मदत नक्कीच मोलाची ठरते.”
गायीवर वेळीच उपचार झाल्याने तिचा जीव वाचवण्यात यश आले. या घटनेतून मुक्या प्राण्यांप्रती संवेदनशीलता आणि संकटाच्या वेळी तत्पर मदतीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.



