ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय रुग्णसेवेसाठी नेहमीच प्रयत्नशील..

▪️नऊ महिन्यांत 2 लाख 28 हजार 530 बाह्यरुग्ण तर 33 हजार 772 आंतररुग्णावर केले उपचार -अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे यांची माहिती

 

संपादक – 🔹शिल्पा बनपूरकर

धुळे – ( इंडिया 24 न्यूज ) : दिनांक 7 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्त); येथील श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय रुग्णसेवेसाठी नेहमीच प्रयत्नशील असून 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर या कालावधीत 2 लाख 28 हजार 530 बाह्यरुग्ण तर 33 हजार 772 आंतररुग्णावर उपचार केले आहेत. तसेच 4 हजार 229 महत्वाच्या शस्त्रक्रिया, 3 हजार 256 किरकोळ शस्त्रक्रिया तसेच 6 हजार 683 महिलेची प्रसुती केली असून त्यात 2 हजार 377 सिझेरियन शस्त्रक्रियांचाही समावेश असल्याची माहिती श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण मोरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

अधिष्ठाता डॉ.मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी रुग्णालयात पुरेसा औषधसाठा, साधनसामुग्री, वस्तूंसाठी रसायने व किट्ससाठी तसेच ऑक्सिजनसाठी तातडीने 24 तासात जिल्हा नियोजन समितीमार्फत 5 कोटी 10 लाख इतक्या रक्कमेची प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. त्याअनुषंगाने 5 कोटी 10 लाखाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असून औषधी व अनुषंगिक बाबींचे पुरवठा आदेश 10 दिवसांत नोदविण्यात येतील व सदरील बाबी पुढील 9 महिन्यांकरीता उपलब्ध होणार आहे.

सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथील मध्यवर्ती औषधी भांडारात 486 प्रकारची विविध औषधी उपलब्ध आहेत. सदरील औषधीमध्ये जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक औषधांचा समावेश आहे. मध्यवर्ती औषधी भांडारातून रुग्णालयातील सर्व रुग्णकक्ष, बाह्यरुग्ण विभाग, अपघात विभाग शस्त्रक्रिया इ. ठिकाणी पुरवठा केला जातो. औषधे ही सर्वकाळ उपलब्ध राहतील याची खबरदारी रुग्णालय प्रशासनाकडून घेतली जात आहे.

श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे केवळ धुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर सभोवतालच्या जळगांव, नाशिक, नंदुरबार तसेच गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेवरील रुग्ण देखील औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असतात. तसेच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, इंदोर-पुणे राष्ट्रीय महामार्ग, सोलापूर-धुळे राज्य महामार्ग हे या शहरातून जात असल्यामुळे परिसरातील मोटार अपघातांचे रुग्णही या रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल होतात.

माहे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत खालीलप्रमाणे रुग्ण संख्या व रुग्णांवर उपचार करण्यात आले. बाह्यरुग्ण संख्या 2 लाख 20 हजार 479, आंतररुग्ण संख्या 41 हजार 764, महत्वाच्या शस्त्रक्रियांची संख्या 5 हजार 833, किरकोळ शस्त्रक्रिया 3 हजार 237, एकुण प्रसुती 8 हजार 937, त्यातील सिझेरियन शस्त्रक्रिया २ हजार ९६७ करण्यात आली आहे. तर 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत बाह्यरुग्ण संख्या 2 लाख 28 हजार 530, आंतररुग्ण संख्या 33 हजार 772, महत्वाच्या शस्त्रक्रियांची संख्या 4 हजार 229, किरकोळ शस्त्रक्रिया 3 हजार 256 तर 6 हजार 683 प्रसुती केली असून त्यातील सिझेरियन शस्त्रक्रिया 2 हजार 377 करण्यात आल्या आहेत.

श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे वर्ग-४ संवर्गाची एकुण 137 पदे रिक्त आहेत. त्यासाठी शासनस्तरावरून जिल्हाधिकारी, धुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आली आहे. समितीने मान्यता प्रदान केलेल्या कंपनी बरोबर गोपनीय करार करण्याची प्रक्रिया ही अंतिमस्तरावर असून त्यासाठी संबंधीत कंपनीशी करण्यात येणाऱ्या करारनाम्याची प्रत, सदरील पदभरतीबाबत वर्तमानपत्रातील प्रसिध्दीसाठी देण्यात येणाऱ्या जाहिरातीचा नमुना, सदरील पदभरतीबाबत संकेतस्थळावर प्रसिध्दीसाठी देण्यात येणाऱ्या जाहिरातीचा नमुना आणि सदरील पदभरतीची माहिती पुस्तिका पाठविण्यात आली आहे. सदरील पदभरती प्रक्रिया ही लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत केवळ 52 सफाईगार हे ३ पाळीमध्ये स्वच्छतेसाठी सर्वोपचार रुग्णालय, धुळे व आवारात उपलब्ध आहेत. सदरील सफाईगार हे रुग्णकक्ष, अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभाग, अतिदक्षता कक्ष व शवविच्छेदनगृह येथे स्वच्छतेसाठी उपलब्ध असतात. अशाप्रकारे उपलब्ध मनुष्यबळाद्वारे स्वच्छतेचे कामकाज केले जाते. याशिवाय केवळ 12 सफाई कर्मचारी हे कंत्राटी तत्वावर कार्यरत असून त्यांच्याद्वारे रुग्णालयातील पॅसेज व बाह्यपरिसराची स्वच्छता केली जाते. तसेच 5 सफाई कर्मचारी हे प्रसुती कक्षामध्ये रुग्णसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सदरील सफाई कर्मचारी हे एकुण 650 रुग्णखाटांच्या सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथील स्वच्छतेचे कामकाज प्रयत्नपूर्वक करीत आहेत.

सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथील मध्यवर्ती औषधी भांडारात ४८६ प्रकारची विविध औषधी उपलब्ध आहेत. सदरील औषधीमध्ये जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक औषधांचा समावेश आहे. मध्यवर्ती औषधी भांडारातून रुग्णालयातील सर्व रुग्ण, बाह्यरुग्ण विभाग, अपघात विभाग शस्त्रक्रिया इ. ठिकाणी पुरवठा केला जात असल्याचेही डॉ. मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.