ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभासाठी 30 नोव्हेंबर पासून विशेष मोहिमेचे आयोजन..

 

संपादक – 🔹शिल्पा बनपूरकर

धुळे, दिनांक 28 नोव्हेंबर, 2023 ( इंडिया 24 न्यूज ) : माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे आणि मातामृत्य व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी 30 नोव्हेंबर, 2023 ते 1 डिसेंबर, 2023 या कालावधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बोडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्रधानमंत्री मातृ वंदना 2.0 राज्यात 9 ऑक्टोंबर, 2023 नुसार लागु झाली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व आरोग्य सेवा कार्यक्षेत्रांमध्ये 30 नोव्हेंबर,2023 ते 1 डिसेंबर, 2023 या कालावधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये लागु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत शासनाचे अधिसुचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल अशाच पात्र महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या जिवीत अपत्यासाठी 5 हजार रुपयांचा लाभ दोन टप्प्यात ऑनलाईन पद्धतीने देण्यात येतो. 1 एप्रिल 2022 नंतर दुसरे अपत्य मुलगी असल्यास 6 हजार रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. ही योजना शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळुन इतर सर्व मातांना देय आहे.

▪️प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 ( प्रथम योजना )

पहिल्या अपत्यासाठी गरोदर माता व स्तनदा माता यांना डीबीटीद्वारे मातेच्या बॅक, पोस्ट खात्यात 5 हजार रुपये दोन हप्त्यात जमा करण्यात येतात. प्रथम हप्ता 3 हजार रुपये असून यासाठी मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 6 महिन्याच्या ( 180 दिवस ) आत राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त आरोग्य संस्थामध्ये गरोदरपणाची नोंदणी आणि किमान एक प्रसूती पूर्व तपासणी करुन देणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता 2 हजार रुपये हे बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र, तसेच बाळास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी व हीपॉटायटीस बी किंवा समकक्ष प्राथमिक लसीकरण मिळाल्यानंतर देण्यात येतो.

▪️प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 ( द्वितीय योजना )

दुसरे अपत्ये मुलगी असल्यास एकाच टप्प्यात 6 हजार रुपयांचा लाभ बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र, तसेच बाळास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी व हीपॉटायटीस बी किंवा समकक्ष प्राथमिक लसीकरण मिळाल्यानंतर देण्यात येतो.
वरील दोन्ही योजनामध्ये लाभार्थीनी पुढील निकषापैकी एक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. व त्याचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील. ज्या महिलाचे निव्वळ कौंटुबिक उत्पन्न प्रति वर्ष 8 लाख पेक्षा कमी असावे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला. ज्या महिला अशंत: 40 टक्के किंवा पुर्ण अपंग आहेत. बीपीएल शिधा पत्रिकाधारक महिला. आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत महिला लाभार्थी, ई-श्रम कार्ड धारक महिला, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी, मनरेगा जॉबकार्ड घेतलेल्या महिला. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती, शिधा पत्रिकेमध्ये लाभार्थी मातेचे नाव असलेल्या महिला लाभार्थी.

धुळे जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. एन. देगांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बोडके, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.तरन्नुम पटेल यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.