ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर जिल्ह्यातील कॅन्सर पीडितांना मिळणार दिलासा.

▪️आता मिळणार चंद्रपूरच्या जनतेला 06 महिन्यांत हॉस्पिटल येणार लोकांच्या सेवेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

 

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभूळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) दि. 30 : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पीटलच्या कामाला राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे गती मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कॅन्सर पीडितांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर 2022 पर्यंत या हॉस्पीटलचे केवळ 30 टक्के काम झाले होते. मात्र गेल्या एक वर्षात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हॉस्पिटलच्या उभारणीकरिता घेतलेल्या नियमित बैठका आणि, शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आता हॉस्पीटलचे 87 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये कॅन्सर हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुंबईवरून दूरदृष्यप्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा, जी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, टाटा कॅन्सर हॉस्पीटलचे डॉ. कैलाश शर्मा व त्यांची टीम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर येथे कॅन्सर हॉस्पीटलच्या निर्मितीसाठी चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनची स्थापन करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘27 जून 2019 ला या हॉस्पीटलच्या बांधकामाचे वर्कऑर्डर देण्यात आले. मात्र अडीच वर्षे या रुग्णालयाचे काम पूर्णपणे थंडबस्त्यात पडले. गेल्या वर्षीपासून या कामाला गती देण्यात आली असून एका वर्षात 30 टक्क्यांवरील बांधकाम आज 87 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. कॅन्सर हे हॉस्पीटल येत्या सहा महिन्यात सुसज्ज इमारत आणि अत्याधुनिक उपकरणांसह सज्ज होऊन कॅन्सर पीडितांना उपचाराकरीता उपलब्ध करावा अश्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी दिल्या,’ यावेळी कॅन्सर फाऊंडेशनच्या संचालकांनी कॅन्सर हॉस्पिटल येत्या सहा महिन्यात सुरू करण्याचे आश्वासन दिले.

*‘हॉस्पिटलच्या गुणवत्तेत तडजोड नको’*
कॅन्सर हॉस्पीटलचे बांधकाम, उपकरणांची उपलब्धता, आवश्यक मनुष्यबळ, त्यांचे वेतन आदींसाठी गॅप फंडींगचा विषय तात्काळ मार्गी लावा. तसेच हॉस्पीटलच्या गुणवत्तेमध्ये कुठलीही तडजोड करू नये. याबाबत जिल्हाधिकारी यांनी दर पंधरा दिवसांत कामाचा आढावा घ्यावा. जिल्ह्यातील कॅन्सर पीडित रुग्णांना दिलासा देण्यासाठी या कामात आता प्राधान्याने पुढे जाण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

*आरोग्य तपासणीच्या माध्यमातून होणार कॅन्सरचे निदान*
मोठ्या प्रमाणात कॅन्सर रुग्णांची वाढ ही अतिशय गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील प्रदुषण हा सुध्दा एक घटक त्यासाठी कारणीभूत राहू शकतो. तसेच ब्रेस्ट कॅन्सर, मुखाचा कॅन्सर, गर्भाशय आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आदी प्रकार आज मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची तपासणी करून कॅन्सरचे निदान करण्यासाठी टाटा ट्रस्टच्या वतीने फिरत्या बसच्या माध्यमातून रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

*सुसज्ज व अत्याधुनिक उपकरणांसह निर्मिती*
चंद्रपूर येथे 2 लक्ष 35 हजार चौरस फूट जागेवर 140 खाटांचे चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पीटलचे बांधकाम होत असून हॉस्पिटलची मुख्य इमारत ग्राऊंड फ्लोअर अधिक चार मजले, रेडीएशन ब्लॉक ग्राऊंड फ्लोअर अधिक एक मजला, युटीलिटी ब्लॉक ग्राऊंड फ्लोअर अधिक एक मजला अशी राहणार आहे. याशिवाय रेडीएशन, किमोथेरपीकरीता अत्याधुनिक उपकरणांची उपलब्धता करण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित मनुष्यबळ आदी बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.