ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नोडल अधिकाऱ्यांनी सोपविलेल्या जबाबदारीच्या पुर्ततेची खात्री करावी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

 

मुख्य संपादक तथा संचालक श्री तुळशीराम जांभूळकर

धुळे, दिनांक 15 एप्रिल, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना सोपविलेल्या जबाबदाराची पुर्तता झाल्याची खात्री करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्यात.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियेाजन सभागृहात आयोजित समन्वयक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, रोहन कुवर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले की, लोकसभा निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व यंत्रणा योग्यप्रकारे काम करीत असून यापुढेही नियुक्त केलेल्या सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेली जबाबदारी उत्तमप्रकारे पार पडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे. माध्यम प्रमाणिकरण समितीमार्फत वेळोवेळी उमेदवाराच्या सोशल मीडिया, वृत्तपत्रात प्रसारीत होणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवून फेक न्यूज, वृत्तपत्रातील आक्षेपार्ह बातमीची माहिती घेवून त्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा. ईपीक कार्ड विषयी कंट्रोल रुमला येणाऱ्या तक्रारींची यादी करुन त्या तक्रारींचा त्वरीत निपटारा करावा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील मतदान केंद्रांचे वेब कॉस्टिंगची व्यवस्था करावी. याठिकाणी जीपीएस मॉनिटरींग आणि वेब कॉस्टिंगची वेळेआधीच मांडणी करावी. जीपीएस व वेब कॉस्टींगचा डेटा व्यवस्थित जतन करुन ठेवावा. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी तसेच सैन्यदलातील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रावर रॅम्प तसेच व्हिल चेअरची व्यवस्था करावी. एक खिडकी कक्षातून राजकीय पक्ष, उमेदवारांना विविध परवाने सुलभरित्या उपलब्ध करुन द्यावेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघात स्वीप अंतर्गत कार्यक्रम घेऊन मतदान करण्याविषयी जनजागृती करावी. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. मनुष्यबळाचे योग्य नियोजन करावे. आवश्यकतेप्रमाणे राखीव मनुष्यबळ वापरावे. सी-व्हिजल, नियंत्रण कक्ष आणि एमसीएमसी समितीने त्यांचा दैनंदिन अहवाल संबंधित नोडल अधिकारी यांच्याकडे सादर करावा. लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मनुष्यबळ, प्रशिक्षण, वाहन व्यवस्था, संगणक, स्वीप, माध्यम प्रमाणिकरण समिती, ईव्हीएम, पोस्टल बॅलेट, मतदार यादी, मतदार मदत केंद्र, एक खिडकी योजना व दिव्यांग कक्ष व्यवस्थापन, निवडणूक, खर्च निरीक्षक, वैद्यकीय सुविधा, कर्मचारी प्रशिक्षण आदि बाबींची नोडल अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. सर्व सबंधित नोडल अधिकाऱ्यांनी केलेल्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. या बैठकीस सर्व नोडल अधिकाऱ्यांसह, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.