ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️हिवताप नियंत्रण व प्रतिबंधासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा : जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

धुळे, दिनांक 18 जून, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबरच प्रतिबंध महत्वाचा आहे. हिवतापाच्या निर्मूलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून या आजाराच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ राखणे आवश्यक असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 30 जून 2024 पर्यंत हिवताप प्रतिरोध महिना सादर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हिवतापाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होवून प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग करुन घेण्यासाठी हिवताप जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

✅ *हिवताप नियंत्रण व प्रतिबंध :*

हिवताप हा किटकजन्य आजार असून अनेक आजारांपैकी एक गंभीर व मानवाचा जीवघेणा आजार आहे. हिवताप हा आजार प्लाझमोडियम या एकपेशीय परोपजीवी रोगजंतूपासून होतो.

✅ *हिवतापाची प्रमुख लक्षणे व दुष्परिणाम :*

हिवतापाचे रोगजंतू मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर यकृत व प्लीहाच्या पेशींमध्ये त्यांची वाढ होते. तेथे त्यांचे जीवनचक्र पूर्ण होण्यास 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर जेव्हा वरील रोगजंतू रक्त प्रवाहात मिसळून रक्तातील तांबडया पेशींवर हल्ला करतात, त्या रोग जंतूना मारण्यासाठी रुग्णाचे शरीराचे तापमान खूप वाढते. त्यामुळे रुग्णाला जोराची थंडी वाजून येते, रुग्णास मळमळल्यासारखे वाटते, काही वेळेस उलट्या होतात, खूप डोके दुखते नंतर भरपूर घाम येवून ताप उतरतो व गाढ झोप लागते. पुन्हा २४ तासानंतर ताप येवून वरील प्रमाणे त्रास होतो. खूप अशक्तपणा जाणवतो व रक्तक्षय होण्याची शक्यता असते. गर्भवती महिला व बालकांना हिवतापापासून सर्वाधिक धोका संभवतो. विशेषतः प्लाझमोडियम फॅल्सीपेरम या जंतूमुळे होणारा हिवताप हा मेंदूज्वर होण्यास कारणीभूत ठरतो व तो अत्यंत जीवघेणा मानला जातो. वेळीच उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता असते.

✅ *उपाययोजना :*

हिवताप पूर्णतः मानव निर्मित आजार आहे असे तज्ञांचे मत आहे. कारण हिवतापाचा प्रसार करणाऱ्या डासांचा समूळ नायनाट करणे व डासोत्पत्ती स्थाने नष्ट करुन हिवतापाला आळा घालणे हे मानवाच्याच हातात आहे. हिवतापाला आळा घालण्यासाठी प्रथमतः दोन गोष्टी अंमलात आणावयास हव्यात. एक म्हणजे डासांवर नियंत्रण व हिवतापाने बाधीत झालेल्या रुग्णास समूळ उपचार देऊन रोग जंतूंचा समूळ नायनाट करणे.

✅ *डास नियंत्रणासाठी उपाययोजना :*

किटकनाशक फवारणी: हिवताप पारेषण काळात राज्यातील ग्रामीण भागातील हिवतापासाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्त गावांमध्ये सिंथेटिक पायरेथ्रॉईड गटातील किटकनाशकाची घरोघर फवारणी करावी.
अळीनाशक फवारणीः राज्यात नागरी हिवताप योजने अंतर्गत शहरातील डासोत्पत्ती स्थानांवर प्रत्येक आठवडयाला अळीनाशकाची फवारणी करण्यात येते.
जीवशास्त्रीय उपाययोजनाः किटकनाशकामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विचार करुन राज्यामध्ये योग्य डासोत्पत्तीस्थानांमध्ये डासअळीभक्षक गप्पी मासे सोडण्यात येतात. सदर उपाययोजना ग्रामीण तसेच शहरी भागातही राबविण्यात येते.
किटकनाशक भारीत मच्छरदाण्याः राज्यात हिवताप संवेदनशील निवडक गावांमध्ये मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात येते.

✅ *लक्षात ठेवा, मलेरिया घातक ठरु शकतो:*

कुठल्याही तापाकडे दुर्लक्ष करु नका. हा ताप मलेरिया असू शकतो. हा ताप मलेरिया तर नाही याबद्दल खात्री करुन घ्यावी. औषध विक्रेत्याच्या अथवा स्वतःच्या अल्पज्ञानावर तापाकरीता परस्पर औषधे घेवू नका. यासाठी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, महापालिकेच्या दवाखान्यात किंवा रुग्णालयात मलेरियासाठी सोपी व सुलभ रक्त तपासणी करुन घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण औषधोपचाराचा उपचार घ्यावा. योग्यवेळी समूळ औषधोपचार केल्याने मलेरियाचा रुग्ण खात्रीने व हमखास बरा होतो. हिवतापाच्या निश्चित निदानासाठी तापाच्या रुग्णाचा रक्तनमुना घेवून तो सुक्ष्मदर्शकाखाली तपासणे आवश्यक असते.

✅ *डास नियंत्रणासाठी हे करा :*

मलेरिया पसविणारे डास आपण साठविलेल्या स्वच्छ पाण्यात आढळतात. पाण्याच्या टाक्यात डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून त्या दुरुस्त करणे, त्यास झाकण बसविणे व गळती थांबविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दैनंदिन वापराच्या पाण्याकरीता घरामधील तसेच घराबाहेरील पिंप आठवडयातून दोनदा पूर्णपणे रिकामी व स्वच्छ करून पुन्हा भरणे व ती झाकून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. डासांचा उपद्रव पूर्णपणे टाळण्यासाठी पाण्याच्या सर्व टाक्या तसेच पिंप इत्यादी सर्व साठे डासप्रतिबंध स्थितीत आणि व्यवस्थित झाकून ठेवावे. इमारतीच्या गच्चीवर आणि परिसरात अनावश्यक पाणी साचू देवू नका. परिसरातील घराजवळील पाण्याची डबकी वेळीच बुजवा किंवा वाहती करा.

✅ *डासांपासून संरक्षण:*

वैयक्तीक सुरक्षिततेसाठी झोपतांना विशेषतः किटकनाशक भारित मच्छरदाणीचा वापर करावा. डास प्रतिबंधक यंत्रे, मलम, अगरबत्ती वापरावी. घराच्या खिडक्यांना बारीक जाळीचे पडदे लावावेत. तसेच हिवतापाची लागण झाल्यास घाबरुन जाऊ नये, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्ताची तपासणी करावी व औषधोपचार घ्यावा.

हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबरच प्रतिबंध महत्वाचा आहे. हिवताप निर्मूलनासाठी प्रत्येक नागरीकाचा वैयक्तिक सहभागही त्यामध्ये असणे आवश्यक असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.