ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️धुळे जिल्ह्यात स्टॉप डायरिया अभियानास प्रारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांची माहिती..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

धुळे, दिनांक 3 जुलै, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : धुळे जिल्ह्यात डायरिया आजाराचे प्रमाण वाढू नये, याकरीता केंद्र शासनाच्या सुचनेनुसार ‘स्टॉप डायरिया अभियान 2024’ हे अभियान 1 जुलै ते 31 ऑगस्ट, 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

धुळे जिल्ह्यात 1 जुलै ते 31 ऑगस्ट, 2024 या कालावधीत ‘स्टॉप डायरिया अभियान 2024’ हे विशेष अभियान राबवून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, बी. ए. बोटे, हेमंतराव भदाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेंद्र सोनवणे, सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

अर्भक मृत्यूदर व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्वाचे उद्दिष्ट असून रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या नमुना नोंदणी प्रणालीनुसार (2017-2019) देशात 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 5.8 टक्के बालके हे अतिसारामुळे दगावतात. त्यामुळे अतिसार टाळून मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, महिला व बाल विकास विभाग तसेच ग्रामविकास विभाग अशा सर्व शासकीय यंत्रणेच्या मदतीने हे अभियान राबविण्यात येत आहे. सन 2024 साठीचे “अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएस ची घेऊनी साथ”असे घोषवाक्य घोषित केले आहे.

या अभियानातंर्गत धुळे जिल्ह्यात 0 ते 5 वर्षातील ग्रामीण व शहरी भागातील एकूण 1 लाख 87 हजार 567 लाभार्थी आहे. जिल्ह्यातील 1 हजार 590 शाळा व जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीमध्ये हे अभियान राबविण्यात येईल. यात अतिसार झालेल्या 0 ते 5 वर्षाच्या बालकांना ओआरएस व झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच 8 ते 10 मातांचा/घरांचा गट तयार करून त्यांना ओआरएस चे मिश्रण कसे तयार करावे व बाळाला ते कसे द्यावे याबद्दल माहिती देण्यात येईल. पाच वर्षाखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनसाठी कार्य करणाऱ्या/काळजी घेणाऱ्या पालकाचे योग्य समुपदेशन करण्यात येईल. आशामार्फत गृहभेटीमध्ये ओआरएस व हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येणार आहे. अतिसाराला प्रतिबंध म्हणून आशा सेविकांनी ओआरएस आणि झिंकच्या वापरासाठी तसेच स्वच्छतेविषयी पाणी निर्जंतुकीकरणाचे महत्व समूपदेशन, गृह भेटीदरम्यान सांगण्यात येईल. अति जोखमीचे क्षेत्र (झोपडपट्ट्या, वीटभट्टी, पूरग्रस्त भाग) आणि दुर्बल घटकांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

तसेच समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी ह्या स्टॉप डायरिया अभियान मोहिमेतील मुख्य घटक अतिसारामध्ये ओआरएस व झिंकचे महत्व स्तनपान सुरु ठेवणे, अतिसाराच्या प्रतिबंधासाठी हाताच्या स्वच्छतेचे महत्व आणि शौचाची विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयाचा वापर ह्या विषयी महत्व पटवून देण्यात येणार आहे. दुषित पाण्यामुळे अतिसार हा आजार होऊन धोका संभवतो त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून, गाळून पिणे आवश्यक आहे. या अभियानात पाणी शुद्धीकरण, परिसर स्वच्छता व जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबविण्यात येऊन समुपदेशन, जनजागृती, प्रभात फेरी, शाळेत हात धुण्याचे प्रात्यक्षिक तसेच स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येणार आहे. त्यानुसार विभाग प्रमुखांना सूचना करण्यात आलेल्या आहेत.

▪️अतिसार व उपचार..

अतिसारामध्ये ओआरएसचे द्रावण व झिंक गोळी सर्वात प्रभावी उपचार पद्धती असून अतिसाराला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक त्या विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ओआरएस) आणि जस्त हे अतिसार उपचारांसाठी जागतिक मानक आहे. त्याच्या सोप्या सादरीकरणात, ओआरएस हे पाणी, साखर आणि मीठ यांचे मिश्रण आहे. हे संयोजन शरीरातील द्रव बदलण्याची गती वाढवते. ओआरएस नंतर झिंकचा एक कोर्स, एक सूक्ष्म पोषक, अतिसाराचा कालावधी आणि तीव्रता कमी करतो. झिंक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, पुर्नप्राप्ती जलद होण्यास मदत करते आणि तीन महिन्यांपर्यंत अतिसार टाळू शकते.

▪️अतिसार प्रतिबंधासाठी..

मातांनी स्वयंपाक करण्यापूर्वी, बालकाला जेवण भरण्यापूर्वी तसेच बालकाची स्वच्छता केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुऊन घ्यावे. पिण्याचे पाणी स्वच्छ, सुरक्षित व झाकूण ठेवावे. नेहमी बालकाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौच करू नये.

जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या स्टॉप डायरिया अभियानात जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सहभाग घेऊन अतिसार थांबवा या अभियानाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.