ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ध्येयप्राप्तीसाठी परिश्रमाचा निर्धार करा..!!

▪️ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.. ▪️मुल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..!!

 

संपादक – सौ. शिल्पा बनपुरकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : दि.०८ – विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. आजचे यश हे उद्याच्या उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करणारे महत्वाचे पाऊल आहे. मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर आकाशामध्ये यशाची उंच भरारी घेण्याची कामगिरी केली आहे. मुल तालुक्याचा गौरव महाराष्ट्रभर, देशामध्ये सुगंध पोहोचेल, असे कार्य करा, अशा शुभेच्छा देताना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना ध्येयप्राप्तीसाठी परिश्रमाचा निर्धार करा, असा संदेश दिला.

मुल येथे आयोजित करिअर व व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन तथा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला सोपान कनेरकर, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, राजेंद्र महाडोळ, माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, नंदकिशोर रणदिवे, प्रभाकर भोयर, चंदू मारगोनवार, अजय गोगुलवार,अनिल सावरकर, महेंद्र करकाडे, किशोर कापगते, सोहम बुटले, माजी नगराध्यक्ष उषाताई शेंडे, प्रवीण मोहुर्ले, सुखदेव चौथाले यांच्यासह पुरस्कारप्राप्त विद्यार्थी, पालक, शिक्षक आदी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

यावेळी ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले. पुढील वाटचाल ठरवितांना आणि लक्ष्य निर्धारित करताना त्याचा निर्धार परिश्रमातून करा. परिश्रमातून केलेला निर्धार हा यशाची वाट स्पष्ट आणि सोपी करतो, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. विद्यार्थ्यांनी मोबाईल, इंटरनेटचा वापर हा अभ्यासाठी आणि आवश्यकते पुरताच करावा, असेही त्यांनी नमूद केले. आई-वडीलांना दुखवून कुठलेही यश मिळविता येत नाही. त्यामुळे आई-वडिलांचा आदर राखा. वाईट संगतीपासून दूर रहा, असाही संदेश ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

ना.श्री. मुनगंटीवार यांनी राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या शैक्षणिक योजनांबद्दल माहीती दिली. मुलींना उच्च शिक्षणात जातपात, उत्पन्न आडवे येऊ नये यासाठी शासनाकडून मुलींच्या व्यावसायिक उच्च शिक्षणाची शंभर टक्के शुल्क माफी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बल्लारपूर येथे साकारण्यात येत असलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये मुलींसाठी वस्तीगृहांची संख्या अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. पुस्तकातील ज्ञानासोबतच व्यावहारीक ज्ञान देखील आवश्यक आहे. यासाठी सरकारकडून सहा महिने १० हजार रुपये सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली असल्याचेही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

बल्लारपूर येथे मुलींसाठी एसएनडीटी विद्यापीठ सुरू झालेले आहे. पुढे या विद्यापीठात ६२ व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. सर्वात जास्त अभ्यासक्रम या उपकेंद्रात राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बाबूपेठ येथे गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्रामध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोरवा एअरपोर्टमध्ये दोन फ्लाईंग क्लब लवकरच सुरू होत आहेत. आपल्या भागातील भगिनी आणि बांधवांना सुद्धा आकाशात उंच भरारी घेता यावी, यासाठी ही सुरूवात आहे. कमर्शिअल पायलट ट्रेनिंगसाठी एकूण ५० लक्ष रुपये लागतात. मात्र प्रतिभावंत गोरगरीब विद्यार्थी केवळ पैशाअभावी या शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी ४८ लक्ष रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आपल्या भागातील विद्यार्थ्यांचे पायलट होण्याचे स्वप्न साकार होणार आहे, अशी माहिती देखील ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.