आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे “बामणी प्रोटीन्स” कंपनीच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काढला यशस्वी तोडगा..

▪️मुख्यमंत्र्यांसोबत झाली मुंबईत बैठक, कामगारांनी मानले ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार

संपादक – सौ. शिल्पा बनपुरकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : दि. 9- महाराष्ट्राचे सरकार गतिशील आणि कृतिशील आहे, काळजी करू नका, तुमची कंपनी सुरु होईल असे आश्वासन कामगारांना देत बल्लारपूर बामणी प्रोटीन्सच्या संचालकांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करून आवश्यक बाबींची पूर्तता करून कंपनी सुरु करण्याच्या सूचना आज राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आज कंपनी संचालकांना दिल्यात; लवकरच सदर कंपनीला अपेक्षित लेखी पत्र देवून बैठक घेऊन ही कार्यवाही पूर्ण होईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिले. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी कामगारांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने तसेच सकारात्मक चर्चा झाल्याने कामगारांनी ना. मुनगंटीवार यांचे आभार मानले.

कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर बामणी प्रोटीन्स येथील भारतीय केमिकल वर्कर युनियनच्या कामगारांना दिले होते. गत मार्च महिन्यापासून बंद असलेल्या बामणी प्रोटीन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलन मंडपाला ना. श्री. मुनगंटीवार यांनी नुकतीच भेट देऊन कामगारांची विचारपूसही केली होती.

मंगळवारी विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामगारांचे म्हणणे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी ऐकून घेतली; पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी विषयाचे गांभीर्य आणि पार्श्वभूमी सांगत हा एक हजार कुटुंबाचा प्रश्न असल्याचे सांगितले. केरळ सरकारकडून संचालित या कंपनीच्या “डिस्चार्ज वॉटर” चा प्रश्न महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचना आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची भुमिका त्यांनी विषद केली. मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सर्वच अधिकाऱ्यांना यातून सकारात्मक तोडगा काढून कामगारांना न्याय मिळावा यादृष्टीने मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. या चर्चेत कंपनीच्या वरिष्ठ संचालकांशी मुख्यमंत्र्यांनी थेट चर्चा करून मार्ग काढण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र शासन यासाठी पूर्णपणे सहकार्य करेल अशी आश्वासन देखील कंपनीच्या संचालकांना दिले. यावर कंपनीने मुख्यमंत्र्यांच्या सुचनेचा सन्मान ठेवत, महाराष्ट्र शासनाकडून या संबंधी आवश्यक पत्र व्यवहार झाल्यानंतर कंपनीच्या बोर्ड मीटिंग मध्ये प्रस्ताव ठेवण्यात येईल व नंतर कंपनी सुरु करण्याबाबत सुतोवाच केले.

सदर बैठकीला भारतीय केमिकल वर्कर युनियनचे बामणी प्रोटीन्स अध्यक्ष देवराव नींदेकर व त्यांचे प्रतिनिधी, बामणी प्रोटीन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री. इकबालसिंग चहल, श्री. विकास खारागे, जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अविनाश ढाकणे, कामगार विभागाच्या सचिव श्रीमती विनीता सिंघल, कामगार आयुक्त आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.