आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत वीज कामगारांच्या रास्त मागण्या मान्य..

▪️राज्यभर सुरू होते आंदोलन..

 

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

मुंबई – ( इंडिया 24 न्यूज ) विविध मागण्या घेऊन वीज निर्मिती केंद्रातील कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले होते. चंद्रपूरातही यंग चांदा ब्रिगेडच्या वीज कामगार संघटनेचे अध्यक्ष हरमन जोसेफ यांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. आमदार किशोर जोरगेवार हे आंदोलकांच्या सतत संपर्कात होते. दरम्यान, आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यात कामगारांच्या रास्त मागण्या मान्य करण्यात आल्या.
या बैठकीला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार किशोर जोरगेवार, उपोषणकर्ते हरमन जोसेफ यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांना सध्या मिळत असलेल्या एकूण पगारात (बेसिक व पूरक भत्ता) १ एप्रिल २०२३ पासून ३०% वेतनवाढ देण्यात यावी, मा. मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारसींनुसार तातडीने अंमलबजावणी करून महानिर्मितीमधील सर्व कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत कंत्राटदारविरहित शाश्वत रोजगार एन एम आर च्या माध्यमातून देऊन नोकरीमध्ये सुरक्षा द्यावी. तसेच, महानिर्मिती कंपनी कोणत्याही कंत्राटी कामगाराला काढणार नाही असे परिपत्रक महानिर्मिती व्यवस्थापनाने त्वरित निर्गमित करावे, महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी ईएसआयची वेतन मर्यादा ओलांडली आहे, त्यामुळे त्यांना ईएसआयचा वैद्यकीय लाभ मिळत नाही. तरी, अतिरिक्त लाभ म्हणून मेडिक्लेम योजना सुरू करण्यात यावी, या मागण्यांसह इतर मागण्या घेऊन वीज निर्मिती कामगारांनी राज्यभरात आंदोलन सुरू केले होते.
चंद्रपूरातही यंग चांदा ब्रिगेडचे वीज कामगार नेते हरमन जोसेफ यांनी उपोषण आंदोलन सुरू केले. आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन वेळा या उपोषण आंदोलनाला भेट देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर आंदोलनाची माहिती दिली होती. सदर आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली होती, त्यामुळे ते टाळण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार सतत या आंदोलनाकडे लक्ष ठेवून होते. दरम्यान, आज जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर कामगारांची उपमुख्यमंत्र्यांसह मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घडवून आणली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांसह चर्चा करत त्यांच्या जवळपास सर्व रास्त मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सदर निर्णयाबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.