ताज्या घडामोडी

▪️ सुरक्षिततेकडे नेहमीच दुर्लक्ष ;,जीवघेण्या अपघाताने आणखी किती वारकऱ्यांचे बळी घेणार ?

▪️भरधाव वेगातील मोटार दिंडीत घुसल्याने घडलेल्या दुर्घटनेत मायलेकासह सात वारक-यांचा मृत्यू झाला..!!

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

सोलापूर (इंडिया 24 न्यूज )सुरक्षिततेकडे नेहमीच दुर्लक्ष ; जीवघेण्या अपघाताने आणखी किती वारकऱ्यांचे बळी घेणार ?
पंढरपूरकडे पायी चालत निघालेल्या वारक-यांच्या दिंडीत भरधाव वेगातील मोटार घुसल्याने घडलेल्या दुर्घटनेत मायलेकासह सात वारक-यांचा मृत्यू झाला
कार्तिकी यात्रेसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आस घेऊन पंढरपूरकडे पायी चालत निघालेल्या वारक-यांच्या दिंडीत भरधाव वेगातील मोटार घुसल्याने घडलेल्या दुर्घटनेत मायलेकासह सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला.
तर पाच वारकरी जखमी झाले. सांगोला-मिरज रस्त्यावर जुनोनी येथे सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
यानिमित्ताने वारकऱ्यांच्या दिंड्यांची सुरक्षितता पुन्हा ऐरणीवर आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी व आसपासच्या गावांतील वारक-यांच्या दिंडीवर काळाने घाला घातला असून अपघातात मोटारीने दिंडीत घुसून वारक-यांना अक्षरशः चिरडत गेल्याचे दिसून आले.
रंजना बळवंत जाधव (वय ५५),
सुनीता सुभाष काटे (वय ५५),
शांताबाई सुभाष जाधव
(वय ५०),
सर्जेराव श्रीपती जाधव (वय ४५),
शारदा आनंदा घोडके (वय ४०, सर्व रा. जठारवाडी),
सुशीला पवार (वय ३५) आणि तिचा मुलगा गौरव पवार
(वय १४, रा. वळिवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर)
अशी या अपघातातील मृत वारक-यांची नावे आहेत.
जखमींमध्ये मृत सुनीता काटे यांचे पती सुभाष केशव काटे (वय ६७) यांच्यासह अनिता गोपीनाथ जगदाळे (वय ६०),
सरिता अरूण सियेकर
(वय ४५), शानूबाई विलास सियेकर (वय ३५),
अनिता सरदार जाधव (वय ५५)
यांचा समावेश आहे.
त्यांच्यावर सांगोला ग्रामीण रूग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.

सांगोल्यापासून नजीकच असलेल्या जुनोनीजवळ वारकरी दिंडी आली असताना अचानकपणे पाठीमागून भरधाव वेगाने आलेली एम.एच. १३ डी.ई. ७९३८ ही मोटार कारक चालकाचा ताबा सुटल्याने दिंडीत घुसली आणि वारक-यांना अक्षरशः चिरडत गेली.
तेव्हा तेथे एकच हाहाःकार माजला.मोटारचालकाचे नाव तुकाराम दामू काशीद
(रा. सोनंद, ता. सांगोला) असे असून त्याच्या सोबत दिग्विजय मानसिंग सरदार (रा. पंढरपूर) हा होता.
या दोघांना सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

पंढरपुरात दरवर्षी आषाढी व कार्तिकीसह माघी आणि चैत्री अशा चार यात्रा होता.
या यात्रांमध्ये लाखो वारकरी व भाविकांच्या दिंड्या पायी शेकडो मैल चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात.
परंतु एखाद दुसरा अपवाद वगळता दरवर्षी यात्रांमध्ये वारक-यांच्या दिंड्यांमध्ये मालमोटारी किंवा मोटार कार, टेम्पो घुसतात आणि त्यात निष्पाप वारक-यांचा बळी जातो. गेल्याच वर्षी सोलापूरजवळ मराठवाड्यातील वारक-यांच्या दिंडीमध्ये मालमोटार घुसली होती आणि त्यात १२ वारकरी मृत्युमुखी पडले होते.
अशा जीवघेण्या घटना प्रत्येक वारीच्या वेळी घडतात.
त्यामुळे वारक-यांची सुरक्षितता धोक्यात येते.
अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होते.
एकेका दिंडीमध्ये किमान शंभर ते सात-आठशे वारकरी असतात.
सायंकाळी अंधारातही पायी चालत मार्गक्रमण केले जाते.
यापूर्वी अशा दिंड्यांमध्ये वाहने घुसून झालेल्या बहुसंख्य दुर्घटना सायंकाळनंतर अंधारातच घडल्या आहेत.
दिंड्यांची सुरक्षितता जपताना दिंडीप्रमुखाचीही जबाबदारी तेवढीच महत्वाची ठरते.

सायंकाळी अंधारात दिंडी थांबवावी आणि विश्रांती घेणे अपेक्षित असते.
परंतु त्याकडे दुर्लक्ष होते.
दिंडीच्या पुढे-मागे रस्ता सुरक्षितता म्हणून रिफ्लेक्टर लावलेले पोशाख परिधान केलेले सजग तरूण वारकरी नियुक्त करणे अपेक्षित आहे.
परंतु त्याकडे सर्रास दुर्लक्ष होते. वाहतुकीची वर्दळ जास्त असलेल्या किंवा धोकादायक अपघातप्रवण भागात किमान मोठ्या दिंड्यांसाठी तरी स्थानिक पोलिसांकडून वाहतूक नियमन होणे अपेक्षित आहे.
मात्र त्याबाबत बेफिकीरपणा दाखविला जातो.
त्यातूनच वारकरी दिंड्यांमध्ये बाहेरची बेदरकार वाहने घुसतात आणि वारक-यांना चिरडतात.
या अपघातानंतर तरी रस्ते सुरक्षिततेविषयक प्रशासनासह वारकरी दिंडीप्रमुखांनी गांभीर्य न राहिल्यास पुढील काळात आणखी वारक-यांचे हकनाक बळी जाण्याचा प्रघात सुरूच राहील.
सांगोल्याजवळील या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारक-यांना वारसदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
अशी मदत आणखी कितीवेळा देण्याबरोबरच वारक-यांची सुरक्षितता जपण्यासाठी शासनाने उपाययोजना कृतीत आणावी,
अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.