आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️२२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मंत्र्यांकडून २४ तासात स्थगिती , अधिकारी अर्ध्या रस्त्यातून माघारी..!

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

सोलापूर :(इंडिया 24 न्यूज )आरोग्य विभागातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेशाला खुद्द आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीच स्थगिती दिली आहे.
आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी दुपारी राज्य शासनाने काढले होते.
परंतु २४ तासांतच मंत्री महोदयांनी या आदेशाला स्थगिती दिली.
त्यामुळे रूजू होण्यासाठी निघालेले काही अधिकाऱ्यांना अर्ध्या रस्त्यातून परतावं लागलं. मागील आठवडयात पोलिस विभागातील बदल्यांनाही अशीच स्थगिती दिली गेली होती. त्यानंतर आता आरोग्य विभागातील बदल्यांना स्थगिती दिल्याने राज्य शासनाचं चाललंय काय?
असा सवाल लोक विचारत आहेत.

आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान सुरू असल्याने या बदल्यांना तात्पुरती स्थगिती दिल्याचे पत्र काढले आहे. राज्यातील १७ अधिकाऱ्यांना सहसंचालक, उपसंचालक तर पाच जणांना जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदस्थापना दिली होती.
यात जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ, जिल्हा शल्य चिकित्सक या अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली होती.
यातील काही अधिकाऱ्यांना पदावनत करून पदस्थापना दिली होती.
सोमवारी हे अधिकारी रुजू होण्याच्या तयारीत होते.
पण बदलीच्या स्थगितीचे आदेश आल्याने अधिकारी अर्ध्या रस्त्यातून परतले.

सार्वजनिक आरोग्य खात्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या बदल्या सुरू झाल्या आहेत. शासन आदेशानुसार ११ नोव्हेंबर २०२२ रोजी शासन बदल्यांचा आदेश निघाला.
या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असणारे जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. निवृत्ती राठोड यांची बदली नागपूर या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून झाली होती. डॉ मनोहर बनसोडे हे वैद्यकीय अधीक्षक म्हणून उपजिल्हा रुग्णालय शहापूर (जि ठाणे) येथे होते.
त्यांची बदली उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून झाली होती.
गेवराई(बीड) येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक असणाऱ्या डॉ. महादेव चिंचोले यांची धुळे येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून प्रशासकीय बदली झाली होती.
पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांची सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून प्रशासकीय बदली झाली होती. बीड येथील रुग्णालय प्रशिक्षण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी
डॉ. अशोक हुबेकर यांची प्रशासकीय बदली ही कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून झाली होती.

हे सर्व अधिकारी तात्काळ कार्यमुक्त होऊन बदलीच्या ठिकाणी हजर राहावे असे आदेश होते.
मात्र बदलीचा आदेश आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ताबडतोब १२ नोव्हेंबर २०२२ रोजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा आदेश स्थगित केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.