सेवा केंद्रांच्या गैरकारभारावर प्रशासनाची करडी नजर
दीपक पाचपुते यांच्या तक्रारीची गंभीर दखल; चौकशीचे आदेश — तहसीलदार शरद घोरपडे यांची माहिती..

सुबोध सावंत :-मुंबई विभागीय प्रतिनिधी
अहिल्यानगर, (इंडिया 24 न्यूज )दि. ८ ऑगस्ट
जिल्ह्यातील विविध ‘आपले सरकार सेवा केंद्रां’वरील नागरिकांच्या तक्रारी, सेवा विलंब, वसुलीतील अपारदर्शकता आणि गैरकारभार याबाबत ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरिक समूह जिल्हाध्यक्ष दीपक पाचपुते यांनी केलेल्या निवेदनाची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, प्राथमिक चौकशीसह कार्यवाहीचे आदेश दिले गेले आहेत.
या प्रकरणी माहिती देताना शरद घोरपडे, तहसीलदार (सामान्य प्रशासन), जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर म्हणाले:
> “दि. २८ जून २०२५ रोजी श्री. दीपक पाचपुते यांनी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ कार्यपद्धतीतील त्रुटींविषयी, शुल्काच्या अनधिकृत वसुलीविषयी, तसेच तक्रार निवारण यंत्रणा अकार्यक्षम असल्याबाबत सविस्तर तक्रार सादर केली होती. त्यानंतर दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी मी संबंधित अधिकाऱ्यांना प्राथमिक चौकशीचे आदेश दिले असून, अहवाल प्राप्त होताच आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.”
“कोणतेही सेवा केंद्र हे शासनाच्या धोरणांप्रमाणे पारदर्शकपणे, वेळेत आणि ठरलेल्या दरात सेवा देण्यासाठी बांधील आहे,” असेही घोरपडे यांनी स्पष्ट केले.
सेवा हमी कायदा २०१५, शासन निर्णय व परिपत्रकानुसार ३५ पेक्षा अधिक सेवा ‘आपले सरकार सेवा केंद्रा’तून देणे बंधनकारक असून, विलंब अथवा चुकीच्या आकारणीचे प्रकरण हे गंभीर मानले जाणार आहे.
“जिल्हा प्रशासन नागरिकांचे हक्क केंद्रस्थानी ठेवूनच काम करत आहे. गैरप्रकार करणाऱ्या केंद्रांवर दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही निश्चित होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सदर तक्रारींची तपासणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पातळीवर केली जाणार असून, दोषी आढळणाऱ्या सेवा केंद्रांचे परवाने रद्द, तर काही केंद्रांवर तात्काळ निरीक्षण ठेवण्याचे आदेशही दिले जाणार आहेत.
नागरिकांनी आपले अनुभव व तक्रारी ,किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी थेट संपर्क साधून नोंदवाव्यात, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.