▪️राजुरा मतदारसंघात ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत २.५४ कोटींचा निधी मंजूर!
▪️आदिवासी वस्त्यांच्या विकासासाठी आ. देवराव भोंगळेंच्या प्रयत्नांना यश..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : दि.०५ राजुरा विधानसभा मतदारसंघातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी आणि दुर्गम भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आमदार देवराव भोंगळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी तब्बल २ कोटी ५४ लाख २२ हजार रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मतदारसंघातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी आणि जिवती या चारही तालुक्यांतील आदिवासी वस्त्यांच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.
राजुरा मतदारसंघातील भौगोलिक रचना पाहता, अनेक आदिवासी पाडे आणि वस्त्या आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. या योजनेतून मंजूर झालेल्या निधीमुळे चारही तालुक्यांतील आदिवासी वस्त्यांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, समाजभवन आणि इतर आवश्यक नागरी सुविधांची कामे हाती घेतली जाणार आहेत. यामुळे या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
विकासकामांसाठी कटिबद्ध : आ. देवराव भोंगळे
आदिवासी गाव आणि पाड्यांच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगत, आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, “राजुरा मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. आदिवासी बांधवांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून या निधीतून दर्जेदार कामे करून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
राज्य शासनाच्या ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून हा निधी मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता या मंजूर निधीतून नियोजित विकासकामे लवकरात लवकर सुरू होतील आणि ती दर्जात्मक व्हावीत, यासाठी आमदार देवराव भोंगळे हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. या विकासकामांमुळे मतदारसंघातील आदिवासी बहुल भागातील विकासाचा अनुशेष भरून निघण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



