▪️अवैध दारूविक्री व जुगाराविरोधात जनजागृतीसाठी कावसा येथे आमसभा..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
अकोट – ( इंडिया 24 न्युज ) : अकोट तालुक्यातील कावसा व तरोडा परिसरात वाढत्या अवैध दारूविक्री व जुगाराच्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर व सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच व्यसनमुक्त, निरोगी समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने ग्राम कावसा येथे जनजागृतीपर आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे.ही आमसभा दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता जिल्हा परिषद शाळा, कावसा बुद्रुक येथे होणार असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सभेला दारूबंदी विभाग, पोलीस प्रशासन व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये पोलीस अधीक्षक (दारूबंदी) सीमाताई झावरे, पोलीस निरीक्षक कांबळे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी (IPS) निखिल पाटील, ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे,पत्रकार संजय गावंडे, सरपंच शिवदासजी बुटे, उपसरपंच पांडुरंग वानखडे, सरपंच सुनिता राजेश दामोदर (तरोडा), ठाणेदार गोपालजी ढोले, समाजसेवक देवरावजी अहिर, समन्वय महासंघ अकोलाचे अध्यक्ष धम्मबोधी डोंगरे, माजी पोलीस उपनिरीक्षक मनोहर वानखडे, सामाजिक कार्यकर्ते गजानन कदम व हरिभाऊ लोणकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सदर बैठकीत गावांमध्ये अवैध दारूविक्री व जुगार अड्डे रोखण्यासाठी उपाययोजना, कायदेशीर बाबी, तसेच नागरिकांची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच युवक व नागरिकांमध्ये जनजागृती करून व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.
तरी कावसा, तरोडा व परिसरातील नागरिकांनी या महत्त्वपूर्ण आमसभेस उपस्थित राहून व्यसनमुक्त समाज उभारणीच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन समस्त सजग नागरिक कावसा तरोडा, ता. अकोट, जि. अकोला यांच्या वतीने करण्यात आले आहे.



