▪️जनकल्याण सामाजिक संस्था मूल चे वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*🔸डॉ. आनंदराव कुळे*
*🔸मुल तालुका प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9403179727*
मुल – ( इंडिया २४ न्यूज) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर जनकल्याण सामाजिक संस्था मूल चे वतीने स्थानिक पंचायत समिती सभागृहात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूल नगरीतील जेष्ठ पत्रकार चंद्रकांत मनियार होते तर उद्घाटक म्हणून माजी बांधकाम समिती सभापती प्रशांत समर्थ याशिवाय प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार तथा जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे, पत्रकार युवराज चावरे, पत्रकार प्रमोद मशाखेत्री, देवनिल विद्यालय टेकाडी चे मुख्याध्यापक राजेश सावरकर, तसेच पत्रकार तथा जनकल्याण सामाजिक संस्था मूल चे अध्यक्ष राजू गेडाम विचार मंचावर विराजमान होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत दीपप्रज्वलनाने करण्यात आली. पाहुण्यांच्या स्वागतानंतर राजू गेडाम यांनी प्रास्ताविक भाषण केले व संस्थेच्या कार्याची व विविध उपक्रमांची माहिती दिली.
पहिले पुष्प मुख्याध्यापक राजेश सावरकर यांनी गुंफले आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा शहरी विद्यार्थ्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचे यावर्षीच्या निकालाने स्पष्ट केल्याचे प्रतिपादन केले आणि आता शिक्षण बोर्डाने चॅलेंज पद्धत सुरू केल्याने हे चॅलेंज देणं आणि ते पूर्ण करीत यशस्वी होण्यात ही ग्रामीण विद्यार्थी अग्रेसर ठरत असल्याचे स्पष्ट करीत आता करिअरची निवड करतानाही तो स्पर्धेत पुढेच असायला हवा अशी कामना करीत शुभेच्छा दिल्या.
दीपक देशपांडे यांनी आपल्या वक्तव्यातून शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी कमी सोयीसुविधा उपलब्ध असतांना गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही मागे नसून एक पाऊल पुढे असताना केवळ योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांना मागे खेचल्या जात असताना अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जात असेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आम्ही या कार्यात पूर्ण सहकार्य देऊ आणि आमच्या गावातील, आमच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील विद्यार्थी या स्पर्धेत यशस्वी झाले पाहिजेत यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर असल्याचे स्पष्ट केले व गुणवंतांचा सत्कार हा त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा असल्याने ही तर सुरुवात आहे त्यामुळे आज यश मिळालेल्यांचे मनापासून अभिनंदन करताना या स्पर्धेत कुठेतरी माघारलेलेही उद्या यशस्वी होऊ शकतात याची जिद्द बाळगण्याची आवश्यकता आहे असे स्पष्ट केले व ही अंतिम लढाई नाहीच याचे भान बाळगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
पत्रकार युवराज चावरे यांनी आपल्या शिक्षकी पेशातील अनेक बाबी पुढे ठेवताना आपले आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचे अवलोकन करीत जिद्द चिकाटी आणि संयमाने सातत्य टिकवून यशस्वी वाटचाल केली तर आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले.
उद्घाटक प्रशांत समर्थ यांनी आपल्याला शिक्षण व नौकरी यापेक्षा खेळ व मस्ती करण्यात आनंद मिळत होता पण यांतूनच सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली आणि राजकारणात उतरलो परंतू शिक्षण हे वाघिणीचे दूध असल्याचे स्पष्ट करीत याच शिक्षणाच्या अभावामुळे मी या दिशेने वळलो अशीही कबुली देत आज विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची नितांत गरज असल्याचे स्पष्ट केले.
चंद्रकांत मनियार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वतः घ्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा आढावा घेत जेव्हा आम्हाला आमचा विद्यार्थी विद्यार्थीनी त्यांच्या आयुष्यातील यशस्वीता भेटित स्पष्ट करते आणि ओळख दाखवते त्या क्षणी होणारा परमानंद हा फार महत्वाचा व मौल्यवान असतो असे प्रतिपादन करीत स्पर्धेच्या युगात आपण जिद्द चिकाटी व संयम बाळगून यशस्वी होण्यासाठी संकल्प केला तर यश नक्कीच मिळते असे स्पष्ट करीत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर जनकल्याण सामाजिक संस्था मूल चे वतीने आयोजित निबंध स्पर्धेतील विजेते आणि दहावी बारावीचे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवर यांचे हस्ते प्रमाणपत्र,व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू अल्लीवार यांनी तर आभारप्रदर्शन खेडकर यांनी केले.या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी,शिक्षक , पालक व जनकल्याण सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .