आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

▪️जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑफलाईन सातबाऱ्यावर मिळणार पीक विमा!

▪️आमदार देवराव भोंगळे यांचा पाठपुरावा; केंद्राकडून विशेष निर्णय!

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : दि. ०८ जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्राने विशेष निर्णय घेतला असून आता शेतकऱ्यांना ऑफलाईन सातबाराच्या आधारावर पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलीत असून हा निर्णय जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरला आहे.

संगणकीकृत सातबारा नोंदी उपलब्ध नसल्यामुळे जिवती तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी शासनाच्या पिक विमा व अन्य कल्याणकारी कृषी योजनांच्या लाभांपासून वंचित राहत होते. याप्रश्नी आमदार देवराव भोंगळे यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांना पत्रव्यवहार केला होता.
प्रधानमंत्री पिक विमा हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याने दि. ०६ ऑगस्ट रोजी राज्याचे प्रधान कृषी सचिव श्री. संतोष रस्तोगी यांची भेट घेऊन केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे याबाबत विशेष निर्णय घेण्यासाठी अहवाल सादर करण्याचे सांगितले.
आमदार देवराव भोंगळे यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून केंद्रीय कृषी मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी ऑफलाइन सातबाराच्या आधारावरच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सार्वजनिक हिताच्या प्रत्येक प्रश्नासाठी नेहमी तत्पर राहून ते प्रश्न सिद्धीस नेण्याच्या आमदार देवराव भोंगळे यांच्या भुमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयावर त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

*१४ ऑगस्टपूर्वी बँकेत जाऊन पीक विमा काढण्याचे आवाहन :*

या निर्णयासंदर्भात बोलतांना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या प्रत्येक लोककल्याणकारी योजनांचा लाभ माझ्या मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहचावा, कोणताही घटक आपल्या लाभाच्या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी मी स्वतः आग्रही असतो. या प्रकरणी सुद्धा जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबाऱ्याअभावी फार्मर आयडी (AgriStack) काढणे अशक्य होते. हे मी जाणून होतो. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनापासूनच तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑफलाईन सातबाऱ्याच्या आधारावर प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळावा ही माझी भूमिका होती. माझा पाठपुरावा चालूच होता. आज केंद्रीय कृषी मंत्रालयाने यासंदर्भात विशेष निर्णय घेऊन जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला, याचा निश्चितच आनंद आहे.
आता शेतकऱ्यांनी येत्या १४ ऑगस्ट या अंतिम मुदतीपूर्वी जवळच्या बँकेत जाऊन पीक विमा काढून घ्यावा. असेही मी आवाहन करतो. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हा निर्णय जिवती तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचा दिलासा आहे आणि यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.