आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

◼️ कोंडवाड्यावर अतिक्रमणाचा विळखा; ग्रामपंचायतची झोप कधी उघडणार

 

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही: ( इंडिया २४ न्यूज )
सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय मोहाडी(नले.) हद्दीत मोकाट जनावराच्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी गुरे अतिक्रमण अधिनियम १८७१ अंतर्गत उभारण्यात आलेला कोंडवाडा आज स्वतःच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे.

ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर बांधलेला हा कोंडवाडा सध्या पूर्णपणे मोडकळीस आलेला असून, त्याच्यासमोरच बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहक सेवा केंद्राचे शेड उभारण्यात आले आहे. या शेडमुळे कोंडवाडा अक्षरश: आडोशाला गेला असून त्याचे अस्तित्वच झाकले गेले आहे.

अलीकडेच भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी जागेची मोजणी करण्यासाठी आले असता, ग्राहक सेवा केंद्राच्या शेडमुळे कोंडवाड्याची नेमकी जागा ओळखणेही त्यांना कठीण झाले. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, अशीच परिस्थिती कायम राहिली तर कोंडवाड्याच्या जागेवर टप्प्याटप्प्याने पूर्ण अतिक्रमण होण्याची भीती निर्माण झाली आहे. कालांतराने ही जागा पूर्णपणे गिळंकृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, स्पष्टपणे अतिक्रमण होत असतानाही ग्रामपंचायत कार्यालय मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याची संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे. गावाच्या सार्वजनिक मालमत्तेवर डोळ्यासमोर अतिक्रमण होत असताना जबाबदार यंत्रणा गप्प का? असा जाब नागरिक विचारत आहेत.

आता प्रश्न असा आहे की, ग्रामपंचायत प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करणार का, की अतिक्रमणकर्त्याना मोकळे रान देत राहणार? जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा संतापाचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.