◼️ बस प्रवासात चोरीचा प्रयत्न उधळला; चार महिला आरोपी ताब्यात

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही:(इंडिया २४ न्यूज) दि.११/४/२०२६
सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज सकाळी बस प्रवासादरम्यान चोरीचा प्रयत्न उघडकीस आला असून, चार महिला आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला नागपूरहून सिंदेवाहीकडे बसने प्रवास करत होती. दरम्यान, मौजा तळोधी येथे चार महिला बस मध्ये चढल्या, त्यापैकी दोन महिला फिर्यादीच्या सीटवर तर उर्वरित दोन महिला बाजूच्या सीटवर बसल्या. बस सिंदेवाही बस स्टॅन्ड येथे पोहोचल्यावर एका महिलेने संशयास्पद हालचाल करीत फिर्यादीच्या सीटजवळ ठेवलेल्या बॅगची चैन उघडण्याचा प्रयत्न केल्याचे तिच्या लक्षात आले.
त्यानंतर फिर्यादी महिलेने तत्काळ बसमधील इतर प्रवाशाच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली. सिंदेवाही बस स्टॅन्ड येथे पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत चारही महिला आरोपींना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी चोरीच्या उद्देशाने बॅगची चैन उघडण्याची कबुली दिली.
याप्रकरणी सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्र. ३०५/२०२६ अंतर्गत कलम ६२,३(५),३०३(५) भा.न्या.स. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन प. पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान सिंदेवाही पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रवास करताना आपल्या सामानाची व मौल्यवान वस्तूची विशेष काळजी घ्यावी. तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांना कळवावे.



