▪️MIDC विरोधात भेंडाळा परिसरातील १४ गावांचा एल्गार, भव्य मोर्चा, भाकपाचा सक्रिय सहभाग..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली : ( इंडिया 24 न्युज ) : भेंडाळा परिसरातील १४ गावांतील सुपीक शेती जमीन MIDC प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्याच्या प्रस्तावाविरोधात शेतकऱ्यांनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य विराट मोर्चा काढत तीव्र निषेध नोंदविला. शेकडो शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. “जमीन आमची – निर्णय आमचा”, “MIDC हद्दपार करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या वतीने आयोजित या मोर्चात शेतकऱ्यांनी जमीन देण्यास ठाम नकार दर्शवित MIDC प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. प्रशासनाला निवेदन सादर करून अधिग्रहणाचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) यांचा सक्रिय पाठिंबा लाभला असून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. मोर्चानंतर झालेल्या सभेत भाकपा नेत्यांनी मार्गदर्शन करत शेतकऱ्यांच्या लढ्याला ठाम समर्थन व्यक्त केले.
यावेळी भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, “भाकपा शेतकऱ्यांच्या या लढ्यात खंबीरपणे त्यांच्या सोबत आहे. सुपीक जमीन बळजबरीने घेण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. १४ गावांचा एकच आवाज आहे—जमीन देणार नाही. सरकारने तात्काळ निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”
या प्रस्तावामुळे १४ गावांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून स्थानिकांच्या संमतीशिवाय घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे. मोर्च्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून पुढील काळात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



