आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️उद्योगांच्या सुरक्षेला “खाकी’चे कवच, चोरी, खंडणीखोरांवर” पोलिसांची करडी नजर !

▪️पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक आस्थापनांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यातील औद्योगिक विकास, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि कंपन्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. पोलीस सभागृह, तुकुम रोड, चंद्रपूर येथे आज जिल्ह्यातील विविध कंपन्या, वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL), औद्योगिक प्लांट व आस्थापनांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी यांच्या सह अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर श्री. प्रमोद चौघुले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री. अमोल काचोरे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोनि श्री. अमोल बारापत्रे, पोस्टे रामनगरच्या पोनि श्रीमती प्रभावती एकुरके, पोस्टे दुर्गापूरचे पोनि श्री. संतोष शेगावकर, पोस्टे पडोलीचे पोनि श्री. सुधाकर कोकोडे यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे १०० विविध कंपन्या, WCL व औद्योगिक आस्थापनांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत औद्योगिक परिसरातील सुरक्षा, भंगार चोरी, कामगारांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि बेकायदेशीर दबाव यांवर सविस्तर चर्चा होऊन खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

चोरी व भंगार चोरीला आळाः WCL व इतर कंपन्यांच्या परिसरातील चोरीच्या घटना रोखण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रात्रंदिवस गस्त वाढवली जाईल. संवेदनशील ठिकाणी पोलिसांची विशेष नजर राहील.

वाहतूक कोंडीवर उपाययोजनाः ब्रह्मपुरी ओव्हरब्रिज परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त वाहतूक पोलीस कर्मचारी व बंदोबस्त तैनात करण्यात येईल.

कामगारांना विमा संरक्षण बंधनकारकः कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या दुर्दैवी अपघातांत कामगारांच्या कुटुंबाला त्वरित आर्थिक आधार मिळावा यासाठी सर्व कंपन्यांनी कामगारांचा विमा उतरवणे आवश्यक आहे. यावेळी ‘धारिवाल कंपनी’ने कामगारांचे बँक खाते उघडतानाच विमा जोडल्याची आणि ‘डालमिया सिमेंट’ने पहिल्याच दिवसापासून विमा संरक्षण दिल्याची माहिती समोर आली. या धोरणाचे अनुकरण इतर आस्थापनांनीही करावे, असे आवाहन करण्यात आले.

वाहतूक सुरक्षा जनजागृती मोहीमः कामगारांकडून हेल्मेट व इतर सुरक्षा साधनांचा वापर न होणे चिंताजनक आहे. यावर जिल्हा वाहतूक शाखेमार्फत औद्योगिक आस्थापनांमध्ये विशेष प्रबोधन मोहीम राबवून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे धडे दिले जातील.

खंडणी व बेकायदेशीर दबावाविरुद्ध कठोर कारवाई: कामगारांना हाताशी धरून कंपनी व्यवस्थापनावर धमकी
देणे, अनुचित दबाव आणणे अथवा बेकायदेशीर आर्थिक मागणी (खंडणी) करण्याचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. अशा घटना घडल्यास कंपन्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा; संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला.

औद्योगिक सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनात नियमित समन्वय राखला जाईल. उद्योगांना सुरक्षित वातावरण देणे आणि कामगारांचे हित जोपासणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे श्री. आयुष नोपानी यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. श्याम गव्हाणे यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौघुले यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.