▪️चंद्रपूर बसस्थानक ‘नो CCTV झोन’ – नागरिक असुरक्षित, प्रशासन गप्प.. RTI कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा..

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) :
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील रहिवासी आणि अभियंता शिक्षण घेणाऱ्या आदित्य भारत साढ़वे याच्या मोबाईल चोरीची घटना उघडकीस आली आहे. ही घटना तेव्हा घडली जेव्हा तो आपल्या आईसोबत मुर्तिजापूरहून चंद्रपूर रेल्वे स्टेशनमार्गे बसस्थानकात पोहोचला. बसमध्ये चढल्यावर काही वेळातच त्याच्या लक्षात आलं की त्याचा मोबाईल खिशातून चोरीला गेला आहे.
चंद्रपूर बसस्थानकावर दररोज हजारो विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांची ये-जा सुरू असते. तरीही, येथे वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. विशेष बाब म्हणजे रामनगर पोलीस ठाणं बसस्थानकाच्या अगदी काही पावलांवर असूनही चोर सर्रासपणे घटना घडवत आहेत.
FIR नोंद करण्यास नकार – पोलिसांवर गंभीर आरोप
मोबाईल चोरीची तक्रार करण्यासाठी आदित्य रामनगर पोलीस ठाण्यात गेला असता, पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. चोरीची FIR दाखल करण्याऐवजी केवळ “मोबाईल हरवला” अशी साधी तक्रार नोंदवली गेली. यामुळे नाराज झालेल्या आदित्यने आता जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी तक्रार दिली असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करून विधीवत चोरीची FIR नोंदवण्याची मागणी केली आहे.
RTI कार्यकर्त्यांचा आवाज – आंदोलनाचा इशारा
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष हिमायू अली यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर शहराध्यक्ष हाजी अली यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. हाजी अली यांनी सांगितले की, बसस्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी ना सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ना पुरेशी सुरक्षा. जर लवकरात लवकर सुरक्षा वाढवली गेली नाही आणि कॅमेरे बसवले गेले नाहीत, तर महासंघ जनहितार्थ तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
निवेदन देताना शिल्पा कांबळे, शाहरुख अली, यार मोहम्मद अली, अरबाज अली आणि सुभान खान पठाण उपस्थित होते.
आता पाहावं लागेल की जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या प्रकरणाची दखल घेतात का आणि पीडित विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी पावले उचलतात का.