◼️ पांदन रस्त्याची दुरवस्था; शेतकऱ्यांसह अंत्ययात्रेलाही चिखलातून वाटचाल!
🔶 कळमगाव तुकमातील रस्ता झाला खडतर; स्मशानभूमीकडे जाणारा मार्गही अडचणीच्या विळख्यात - तातडीने मुरूम टाकून मजबुतीकरणाची मागणी

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही 🙂इंडिया २४ न्युज )
पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येणाऱ्या कळमगाव तुकूम ग्रामपंचायत हद्दीतील पांदण रस्त्याची पावसामुळे अक्षरशः चिखलवाट झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून पाणी साचल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे याच रस्त्याचा वापर, गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठीही केला जात असल्याने नागरिकांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
▪️ शेतात जाण्याचा मार्ग चिखलात!
कळमगाव तुकून परिसरातील शेतकऱ्यांसाठीही हा पांदण रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतीसाठी आवश्यक असलेली अवजारे, खते, बियाणे तसेच इतर साहित्य शेतापर्यंत ने – आण करण्यासाठी याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून ठीकठिकाणी खड्डे पडले आहेत.
🔸 स्मशानभूमीचाही मार्ग याच रस्त्यावरून!
या रस्त्याचे महत्त्व केवळ शेतीपुरतेच मर्यादित नाही. गावातील स्मशान भूमीकडे जाण्यासाठीही याच मार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर चिखल आणि पाणी साचल्याने अंत्ययात्रेच्यावेळी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देतानाही चिखलातून वाट काढावी लागणे, ही गावासाठी गंभीर आणि संवेदनशील बाब आहे. अंत्ययात्रेतील नागरिकांना खराब रस्त्यावरून मार्गक्रम करावे लागत असल्याने प्रशासनाने या समस्येकडे केवळ विकासकाम म्हणून नव्हे, तर नागरिकांच्या मूलभूत सुविधेचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे.
🔹 मनरेगातून रस्त्याचे काम करण्याची मागणी!
पांदण रस्त्याची ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी मनरेगा अंतर्गत रस्त्याचे काम हाती घेऊन त्याचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. तसेच तात्पुरता उपाय म्हणून तातडीने मुरूम टाकून रस्ता वाहतुकीस योग्य करावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत व सबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकरी व ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
▪️” शेतात जाण्यासाठीही हाच रस्ता, समशानभूमी कडे जाण्यासाठी हाच मार्ग!”
एकीकडे शेतकऱ्यांच्या रोजच्या शेतीकामासाठी आवश्यक असलेला मार्ग आणि दुसरीकडे गावाच्या स्मशानभूमीकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता, अशा दोन्ही कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्याची अशी दुरवस्था होणे म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा कळसच, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहे.
” जिवंतपणी शेतात जाण्यासाठी चिखलातून संघर्ष आणि मृत्यूनंतर अखेरच्या प्रवासासाठीही याच चिखलातून वाटचाल!” अशी विदारक परिस्थिती कळमगाव तुकूम येथे निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे होऊन पांदण रस्त्याचे तातडीने मजबुतीकरण करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.



