आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आयुष्मान कार्ड नागरिकांपर्यंत पोहचवा..

▪️पालक सचिवांकडून विविध विभागाचा आढावा..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर, दि. 18 : गरीब आणि सामान्य नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांना नामांकित रुग्णालयात उपचार घेता यावे, या दृष्टीने प्रधानमंत्री आयुष्मान भारत (आभा) कार्ड हे अतिशय महत्वाचे आहे. या कार्डचे वाटप करून नागरिकांपर्यंत त्याचे फायदे पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष शिबिरांचे आयोजन करावे, अशा सुचना राज्याचे अपर मुख्य सचिव (उच्च व तंत्र शिक्षण) तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी दिल्या.

नियेाजन सभागृह येथे विविध विभागांचा आढावा घेतांना ते बोलत होते. जिल्ह्यातील काही विषय शासनस्तरावर प्रलंबित असतील तर त्याबाबत अवगत करावे, जेणेकरून संबंधित विषयाला गती देता येईल, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पुढे अपर मुख्य सचिव श्री. रेड्डी म्हणाले, शेतीसंदर्भात माहितीकरीता आवश्यक असलेल्या ‘महाविस्तार’ ॲप बाबत शेतक-यांना अवगत करावे. जिल्ह्यातील शेतक-यांनी पेरणी केली असून आतापर्यंत केवळ सरासरीच्या 59 टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाचा खंड पाहता जास्तीत जास्त शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. शेतक-यांना कर्जवाटप करतांना राष्ट्रीयकृत बँकांनी गांभिर्य राखावे.

मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे, पुर्वोत्तर राज्यातून आता आपल्या भागात हत्तींचे आगमन होत आहे. मानवी वस्तीजवळ ते पोहचणार नाही, याची काळजी वन विभागाने घ्यावी, असे श्री. रेड्डी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कृषी विभाग, नैसर्गिक आपत्ती, वन विभाग, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, आरोग्य विभाग आदींचा आढावा घेतला.

सादरीकरणात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याची पावसाची सरासरी 1084 मि.मी आहे. गतवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात 1254 मि.मी (115 टक्के) पाऊस पडला होता. यावर्षी मात्र जून ते 15 सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या केवळ 646 मि.मी. (59 टक्के) पाऊस पडला आहे. 11 तालुक्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून जिल्ह्यात यावर्षी भात, कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी व इतर पिकांची 4 लक्ष 68 हजार 771 हेक्टरवर पेरणी झाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.