▪️घुग्घुसच्या ३२ आशा वर्कर स्वयंसेविकांच्या थकीत कोरोना काळातील उर्वरित रकमेचा १५ दिवसांत द्या..
▪️आजाद समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन! सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
घुग्घुस – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्हा चंद्रपूर : कोरोना महामारीच्या संकटात नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या घुग्घुस येथील ३२ आशा वर्कर स्वयंसेविकांच्या प्रलंबित प्रोत्साहनपर रकमेचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याची तक्रार आजाद समाज पार्टी चे विदर्भ सचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांचा समोर आला आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता आरोग्यविषयक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या या महिलांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळवण्यासाठी आजही प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर ही बाब गंभीर असून प्रशासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे.
संबंधित आशा वर्कर स्वयंसेविकांच्या म्हणण्यानुसार, कोरोना काळात दरमहा ₹१,००० अतिरिक्त प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना केवळ दोन महिन्यांची प्रत्येकी ₹१,००० रुपये रक्कम मिळाली असून उर्वरित २२ महिन्यांची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याची त्यांची तक्रार आहे.
केंद्र सरकारच्या कोरोना प्रोत्साहनपर रकमेच्या तरतुदी आणि महाराष्ट्र शासनाच्या कोविड भत्त्याबाबतच्या नोंदी लक्षात घेता, घुग्घुसमधील या ३२ महिलांच्या पात्रतेची, निधी मंजुरीची आणि प्रत्यक्ष वितरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
प्रशासनाने जनतेला उत्तरे द्यावीत!
१. घुग्घुसमधील ३२ आशा वर्कर स्वयंसेविकांसाठी कोरोना काळातील प्रोत्साहनपर रक्कम मंजूर झाली होती तर आज चार वर्षे ओलांडून सुद्धा रक्कम का देण्यात आली नाही.
२. केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाकडून संबंधित कालावधीसाठी किती निधी मंजूर व वितरित करण्यात आला?
३. संबंधित महिलांना केवळ दोन महिन्यांचीच रक्कम मिळाल्याची तक्रार असल्यास उर्वरित रकमेची स्थिती काय आहे?
४. चंद्रपूर जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या पात्र आशा वर्कर स्वयंसेविकांना रक्कम मिळाली असल्यास घुग्घुसमधील महिलांच्या प्रकरणात काय अडचण आहे?
५. शासनाच्या नियमांनुसार पात्र ठरणाऱ्या महिलांची थकीत रक्कम अद्याप वितरित का झाली नाही?
या प्रश्नांची उत्तरे केवळ तोंडी आश्वासनांतून नव्हे, तर अधिकृत शासन निर्णय, निधी वितरणाच्या नोंदी आणि लेखी चौकशी अहवालातून मिळाली पाहिजेत.
१५ दिवसांची मुदत; अन्यथा आंदोलन!
आजाद समाज पार्टीच्या वतीने प्रशासनाकडे ठाम मागणी करण्यात येत आहे की, घुग्घुस येथील ३२ आशा वर्कर स्वयंसेविकांच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करून शासनाच्या नियमांनुसार देय असलेली थकीत प्रोत्साहनपर रक्कम अदा करावी.
निवेदन प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत पात्र महिलांच्या थकीत रकमेबाबत ठोस निर्णय घेऊन देय रक्कम वितरित करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा.
अन्यथा, आजाद समाज पार्टीच्या वतीने संबंधित आशा वर्कर स्वयंसेविकांना सोबत घेऊन प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
आशा वर्कर स्वयंसेविकांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार!
कोरोना काळात समाजाच्या आरोग्यासाठी योगदान देणाऱ्या महिलांच्या आर्थिक हक्कांकडे दुर्लक्ष होता कामा नये. शासनाच्या नियमांनुसार त्यांना जी रक्कम देय आहे, ती मिळालीच पाहिजे. संबंधित निधी मंजूर असूनही वितरणात त्रुटी झाल्या असतील, तर त्याची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कार्यवाही झाली पाहिजे.
हा प्रश्न केवळ ३२ महिलांच्या पैशांचा नसून, त्यांच्या कामाचा सन्मान आणि त्यांना मिळणाऱ्या न्यायाचा आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी.
१५ दिवसांत ठोस कार्यवाही करा; अन्यथा रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करू!
सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव
विदर्भ सचिव, आजाद समाज पार्टी
घुग्घुस, ता. जि. चंद्रपूर.
सौ. रिताताई फकरु देशकर जिल्हा महासचिव आजाद समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर



