▪️राम मोहनपूर आंगणवाडीचा बोजवारा!
▪️शिक्षिका रिटायर्ड होऊन महिने उलटले, 3-4 महिन्यांपासून भरती प्रक्रिया रखडली.. उपसरपंचांचा सवाल?

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : राम मोहनपूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील राम मोहनपूर गावातील आंगणवाडीचा कारभार पूर्णपणे ठप्प झाला असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका चिमुकल्यांना बसत आहे.
येथील आंगणवाडी सेविका मॅडम सेवानिवृत्त होऊन बराच काळ लोटला आहे. त्यामुळे ही आंगणवाडी गेल्या अनेक महिन्यांपासून खाली आणि बंद अवस्थेत पडून आहे. मुलांचा पोषण आहार, गरोदर मातांची तपासणी आणि लहान मुलांचे शिक्षण सर्व काही बंद आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या संदर्भात मागील 3 ते 4 महिन्यांपूर्वी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, परंतु ती प्रक्रिया आजपर्यंत पूर्णपणे झालेली नाही. ही प्रक्रिया अर्धवट अवस्थेतच रखडली आहे.
यासंदर्भात गावचे उपसरपंच आणि ग्राम सरकार यांनी लेखी निवेदनातून प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या आंगणवाडीसाठी एका सुशिक्षित महिलेची तात्काळ नियुक्ती करावी. विशेष म्हणजे राम मोहनपूर हे बंगाली बहुल गाव असल्याने, येथे नियुक्त होणाऱ्या सेविकेला मराठी आणि बंगाली दोन्ही भाषांचे ज्ञान असणे आणि संबंधित विषयात शिक्षण उत्तीर्ण असणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून ती लहान मुलांना आणि मातांना व्यवस्थित समजावून सांगू शकेल.
प्रशासनाने याची तात्काळ नोंद घेऊन ही रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी आर्त हाक उपसरपंच आणि पालक वर्गाकडून देण्यात येत आहे. नियुक्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. तक्रारदार: उपसरपंच, ग्राम सरकार आणि समस्त पालक वर्ग, राम मोहनपूर, ता. चामोर्शी



