▪️दुष्काळग्रस्तांच्या यादीत बल्लारपूर, जिवती, ब्रह्मपुरी तालुक्याचा समावेश; आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार..
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तीनही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण प्रतिसाद मिळाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तीन तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आग्रहीपणे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाने या तिन्ही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत शासनादेश निर्गमित केला आहे. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाचे अनिश्चित स्वरूप, पिकांची चिंताजनक स्थिती आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळणे आवश्यक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला होता; मात्र बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तीन तालुक्यांचा त्यात समावेश झाला नव्हता. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नाला प्राधान्य देत शासनस्तरावर पाठपुरावा केला.
दुष्काळाची तीव्रता निश्चित करताना केवळ प्रशासकीय आकडेवारीचा विचार न करता प्रत्यक्ष परिस्थिती, पर्जन्यमानातील तूट, पिकांची अवस्था आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा वस्तुनिष्ठ विचार व्हावा, अशी आ. सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका होती. याच अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी तालुक्यांतील परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या या तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, यासाठी त्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली होती.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाची दखल घेत मदत व पुनर्वसन विभागाकडून आता तिन्ही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे यापूर्वीच्या यादीत समावेश न झालेल्या या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. शासनाच्या प्रचलित निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना विविध सवलती आणि मदतीचा लाभ मिळण्यासाठी या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव ठेवून त्यांचे प्रश्न शासनाच्या निर्णयप्रक्रियेपर्यंत पोहोचविणे आणि त्यावर ठोस कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करणे, ही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश व्हावा, यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार याच भूमिकेचे उदाहरण आहे. दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वगळलेल्या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांचा प्रश्न सातत्याने लावून धरत त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. आता मदत व पुनर्वसन विभागाकडून शासनादेश निर्गमित झाल्याने या तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या दुष्काळी मदतीच्या अपेक्षांना बळ मिळाले आहे.



