आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*जिल्हा प्रशासनाकडून पूर परिस्थितीच्या अनुषंगाने उचित सतर्कता बाळगण्यासंदर्भात सावधानतेचा इशारा*

 

जिल्हा प्रतीनिधी -: अरुण माधेशवार.

चंद्रपूर, दि. 8 ऑगस्ट: भारतीय हवामान विभागाने दि. 8 व 10 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर दि.9 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट दिला आहे. दि. 7 ऑगस्ट 2022 पासून वैनगंगा, वर्धा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये व चंद्रपूर जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द प्रकल्प, वर्धा नदीवरील अप्पर वर्धा प्रकल्प व निम्न वर्धा प्रकल्प, इरई नदीवरील इरई धरण, पैनगंगा नदीवरील ईसापुर धरण व वर्धा नदीच्या उपनद्या वरील धरणांमधून अधिकचे विसर्ग प्रवाहित करण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे पाण्याचा येवा वाढल्यास धरणातून विसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, जिल्ह्यात वाहणाऱ्या वैनगंगा, वर्धा, पैनगंगा व इरई या नद्यांकाठी पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या हवामान विभागाने दिलेला पावसाचा रेड अलर्ट व ऑरेंज अलर्ट तसेच वैनगंगा, वर्धा, पैनगंगा व इरई नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता, संबंधित तहसीलदार यांनी संभाव्य पूरबाधित भागात वेळोवेळी दवंडी द्यावी. तसेच प्राप्त परिस्थितीचा विचार करून विविध विभागांच्या समन्वयातून आवश्यकता पडल्यास तात्काळ सदर परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी.
नदीकिनारी गावातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी. तसेच नदी/नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही पूल ओलांडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.