ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी पीक पद्धतीत बदल होणे आवश्यक : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

 

संपादक – सौ. शिल्पा बनपुरकर

▪️येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात 3 लाख 85 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट कृषि निवष्ठांचे गुणवत्ता नियंत्रणासाठी 5 भरारी पथके कार्यरीत करण्यात येणार 16 गुणवत्ता निरिक्षकांमार्फत जिल्हास्तरावर सनियंत्रण करण्यात येणार..

धुळे, दिनांक 23 एप्रिल, 2024 (जिमाका वृत्तसेवा): धुळे जिल्हा हा अवर्षण प्रवण जिल्हा असून पावसाचे पाणी अडविण्यासाठी जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात यावीत. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी पीक पद्धतीत बदल होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात आज जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2024 ची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ, प्रकल्प संचालक (आत्मा) नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले की, जिल्ह्यात 2 लाख 19 हजार 880 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी कापूस पिकाला पर्याय म्हणून अधिकाधिक क्षेत्रावर मका पिकाची लागवड करावी. जेणेकरुन मका पिकावर प्रक्रिया उद्योग तसेच इथेनॉल सारखे पदार्थ तयार होण्यासाठी याचा उपयोग होवू शकेल. याकरीता मका पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावेत. मका पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कंपनी प्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी प्रात्याक्षिकांचे आयोजन करावेत. गतवर्षी जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे कृषी विभागाने 15 जूनपर्यंत जलसंधारणाची कामे लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात करावी. जिल्ह्यातील स्वयंचलीत हवामान केंद्र कार्यान्वित करुन दर तीन महिन्यांनी कृषी सहायकांनी या केंद्राला भेट देवून त्याची तपासणी करावी.

जिल्ह्यात यावर्षी 3 लाख 85 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट निश्चित असून साक्री तालुक्यातील पश्चिम पट्टयात भात पिकाच्या लागवडीवर अधिकभर देवून उत्पादन खर्च कमी करुन उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रयत्न करावा. शेतकऱ्यांना कीड व रोगाची ओळख करुन देण्यासाठी शेतीशाळा आयोजित करण्यात याव्यात. खुरसणी तसेच भुईमूग क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करावेत. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी झालेले नाही अशा शेतकऱ्यांची यादी गावस्तरावर प्रसिध्द करण्यात यावी.

रासायनिक खत विक्रेत्यांनी खताची विक्री शासकीय दरानेच करावी. जादा दराने विक्री, बियाणे, खते तसेच कृषि निविष्ठा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. युरीयाचा वापर कमी होण्यासाठी नॅनो युरियाचा वापर वाढविण्यावर भर देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. शेतकऱ्यांच्या मागणी नुसार खते व बियाणे विक्रेत्यांनी उपलब्ध करुन द्यावे. सेंद्रीय खते, कंपोस्ट, गांडुळ खत, जिवाणु खते वापरण्यासाठी जनजागृती करावी. शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करावे. शेतकऱ्यांना वैयक्तिक बांबु लागवड, फळबाग लागवड तसेच रेशीम शेतीसाठी प्रोत्साहीत करावे अशा सूचना श्री. गोयल यांनी दिल्यात.

विभागीय कृषि सहसंचालक श्री. वाघ म्हणाले की, यावर्षी खरीप हंगामात 100 टक्के ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणीसाठी अंगणवाडी सेविका, कृषि सहायक, तलाठी यांची मदत घ्यावी. बनावट बियाणे, खते व औषधे तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना करावी, शेती उत्पादक कंपनी, बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी मानव विकास विभागास प्रस्ताव सादर करावेत. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहीत करावे.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शिरसाठ यांनी खरीप हंगाम 2024 साठी कापूस व सोयाबीन पिक वगळता 1 लाख 39 हजार 834 हेक्टर क्षेत्रासाठी 22 हजार 312 क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात 2 लाख 19 हजार 880 हेक्टर क्षेत्रासाठी बी.टी.कापूस बियाण्यासाठी 11 लाख पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी 1.336 लाख मे.टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे. पैकी 1.058 लाख मे.टन खताचे आवंटन कृषि आयुक्तालयाने जिल्ह्यासाठी मंजूर केले आहे. तसेच 71 हजार नॅनो युरियाचे आवंटन मंजूर केले आहे. कृषि निवष्ठांचे गुणवत्ता नियंत्रणासाठी 5 भरारी पथके कार्यरीत करण्यात आले असून 16 गुणवत्ता निरिक्षकामार्फत जिल्हास्तरावर सनियंत्रण करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवड योजना तसेच भाऊसाहेब पांडूरंग फुडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत 6 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. यंदा कृषी विभागास यावर्षी 5 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी सादरीकरणात दिली. यावेळी कर्ज वितरण, कृषि विद्युत जोडणी, पशुसंवर्धन विभाग, दुग्ध विकास विभागाचा आढावा घेण्यात आला.

प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना पीक,कीड परिस्थितीची माहिती देण्यासाठी माहितीपत्रक व पुस्तिकचे अनावरण करण्यात आले. तसेच 2023-2024 मध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या कृषि सहायकांचा प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला. बैठकीस सर्व तालुका कृषि अधिकारी, महाबीज, नाबार्ड, पुशसंवर्धन तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.