ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️02-धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु : जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल

 

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभूळकर

धुळे : दिनांक 25 एप्रिल 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 02-धुळे लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, 26 एप्रिल, 2024 पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरवात होत आहे. 3 मे 2024 पर्यंत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या कालावधीत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 02-धुळे लोकसभा मतदारसंघ यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, सार्वजनिक सुटीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाहीत. 4 मे, 2024 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. 6 मे 2024 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल. एकापेक्षा जास्त उमेदवार राहिल्यास 20 मे 2024 रोजी मतदान होईल, तर 4 जून,2024 रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीत उमेदवारांना खर्च मर्यादा 95 लाख रुपये आहे. सोशल मीडियावर जिल्हा प्रशासनाचे लक्ष आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करतांना उमेदवारांना नामनिर्देशन पत्र विहित नमूना 2 ए मध्ये सादर करावयाचा आहे. त्याबरोबर उमेदवाराचे शपथ पत्र नमूना 26, मतपत्रिकेवरील फोटोबाबतचे घोषणापत्र, मतपत्रिकेवर नाव कसे असावे याबाबतचे उमेदवाराचे लेखी पत्र, नामनिर्देशनपत्रासोबत सर्वसाधारण उमेदवारास 25 हजार रुपये अनामत रक्कम तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 12 हजार 500 रुपये मात्र राहील. एक उमेदवार जास्तीत जास्त 4 नामनिर्देशनपत्र सादर करु शकेल, तसेच एक उमेदवार दोनपेक्षा जास्त मतदारसंघात अर्ज करु शकणार नाही. उमेदवारास राजकीय पक्षाचा असल्यास एक सूचक तर अपक्ष असल्यास एकूण 10 सूचक आवश्यक राहील. राजकीय पक्षांचे उमेदवार यांनी पक्षाने प्राधिकृत केल्याबाबत विहीत सूचना पत्र (AA & BB) (नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी 3.00 वाजेपुर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे जमा करणे आवश्यक राहील). नामनिर्देशपत्रासोबत सादर करावयाचे विहित शपथपत्र नमूना 26 मधील सर्व रकाने भरणे आवश्यक असेल. एखादी बाब लागू नसेल तर निरंक/लागू नाही असा तपशील नोंदविणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी साधारणत: तीन महिन्याचे आतील कालावधीत काढलेला फोटो निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडेस नामनिर्देशन पत्रासोबत किंवा जास्तीत जास्त छाननीच्या वेळेपुर्वी द्यावयाचा आहे. फोटोचा आकार 2 cm X2.5 cm (Two cm in breadth and 2.5 cm in hight) असावा. चेहरा समोर आणि पुर्ण तसेच डोळे उघडे, मागील बाजु पांढऱ्या रंगाची असावी. फोटो रंगीत किंवा ब्लॅक आणि व्हाईट चालेल. उमेदवारांनी सर्वसाधारण कपडे परिधान केलेले असावेत. कोणताही गणवेश असु नये. टोपी, हॅट व गडद रंगाचा चष्मा टाळावा. फोटोचे मागील बाजुला उमेदवाराची किंवा त्याचा निवडणूक प्रतिनिधी यांची स्वाक्षरी असावी. फोटो सोबत विहीत नमुन्यातील परिशिष्ट-2 (उमेदवाराचे नाव, पत्ता असलेले आणि सदर फोटो लगतच्या तीन महिन्यापुर्वी काढलेला असल्याचे घोषणापत्र) असावे. घोषणापत्र नामनिर्देशनपत्रासोबत देणेत येईल. उमेदवाराने दैनंदिन खर्च लो.प्र.अधि. 1951 चे कलम 76 अन्वये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक राहील.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून सी-व्हीजिल (C-VIGIL) ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. आचारसंहिता भंगाबाबतच्या तक्रारी नागरिक या ॲपच्या माध्यमातून करू शकतील. आचारसंहितेचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले, तर संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक निर्ण अधिकारी श्री. गोयल यांनी सांगितले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.