ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणीकरीता जिल्हास्तरीय संनियंत्रण कक्ष स्थापन : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

 

संपादक सौ. शिल्पा बनपुरकर

धुळे, दि. 10 जुलै, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : राज्यातील महिला व मुलींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण”योजना येत्या एक जुलै 2024 पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत 21 ते 65 वयोगटातील मुली व महिलांना दरमहा रु. 1500/- आर्थिक लाभ थेट हस्तांतर पद्धतीने देण्यात येणार आहे. योजनेचा लाभाकरीता 1 जुलै,2024 ते 31 ऑगस्ट,2024 या कालावधीत पात्र लाभार्थ्यांचे ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभापासून धुळे जिल्ह्यातील एकही पात्र महिला वंचित राहता कामा नये तसेच या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तर, तालुकास्तर तसेच शहरी क्षेत्रासाठी नियंत्रण अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समिती, धुळेचे सदस्य सचिव अभिनव गोयल यांनी निर्गमित केले आहे.

जिल्हास्तरीय संनियंत्रण कक्षाचे प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी हे आहेत. तर जिल्हा सहाय्यक आयुक्त, नगर पालिका प्रशासन, उपआयुक्त मनपा, तहसिलदार (महसुल), जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील सहायक लेखाधिकारी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी कार्यालयातील लेखापाल यांचा या कक्षात समावेश आहे. या कक्षामार्फत संपूर्ण जिल्ह्यात देखरेख व संनियंत्रण करणे, योजनेच्या अंमलबजावणीबाबत नियमित तालुकास्तरीय समिती यांच्या बैठका घेऊन आढावा घेणे, जिल्हास्तरीय समितीच्या बैठका, प्राप्त लाभार्थी याद्यांची तपासणी व पडताळणी, दैनंदिन प्राप्त अर्जांची संख्या, पात्र, अपात्र अर्ज संख्याची दैनंदिन माहिती शासनास सादर करणे, तसेच पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करुन जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या लाभार्थ्यांचे बँक खात्यावर लाभांचे डीबीटीद्वारे हस्तातरण करणे. योजनेसाठी उपलब्ध आर्थिक तरतुदीसाठी राज्यस्तरीय समितीकडे मागणी नोंदणी तसेच योजनेच्या प्राप्त तक्रारीची तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करुन तिचे निराकरण करण्याचे काम या जिल्हास्तरीय कक्षामार्फत करण्यात येईल.

ग्रामीण क्षेत्रासाठी सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, पदनिर्देशित बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), पदनिर्देशित संरक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी धुळे, नंदुरबार शहरी प्रकल्प ) यांचा समावेश आहे. या कक्षामार्फत अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत यांचेकडून लाभार्थ्यांच्या अर्जाची स्विकृती, तपासणी, पोर्टलवर अपलोड करणे तसेच ऑफलाईन अर्ज स्विकारुन ऑनलाईन अर्जाचे कामकाज करणे. तसेच ग्रामस्तरावर गावातून सर्व माध्यमातून प्राप्त होणाऱ्या अर्जाची माहिती ठेवणे, ऑफलाईन अर्ज ऑनलाईन करणे तसेच अर्जाची पडताळणी, तपासणी गावातील अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात येईल. याची जबाबदार ग्रामसेवकांची राहील. या कक्षाकडे प्राप्त अर्ज तीन दिवसाच्या आत पडताळणी, तपासणी करुन तालुकास्तरीय समितीकडे सादर करणे बंधनकारक असेल. तालुक्यातील 10 ते 15 गावांचे पर्यवेक्षणासाठी एक समन्वय अधिकारी याचे नेमणूक करणे, समन्वय अधिकारी म्हणून संबंधित विस्तार अधिकारी, पंचायत समितीमधील अन्य अधिकारी यांची नेमणूक तालुकास्तरीय समितीने गावातील लोकसंख्या व अपेक्षित अर्जाची संख्या विचारात घेऊन नेमणूक करावी. दैनदिन प्राप्त अर्जाची सुविधा केंद्रामार्फत डेटा एन्ट्री करुन यादी तयार करावी व यादीचे दर शनिवारी वाचन करण्यात येऊन ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावरती तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त दिनांकीत स्वाक्षरीने प्रसिद्ध करावी. यासाठी ग्रामस्तरावर विशेष शिबिराचे आयेाजन करावे. तालुक्यातील सर्व समन्वय अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवक यांच्यामार्फत तपासणी करुन प्राप्त झालेले अर्ज तपासून तालुकास्तरीय समितीकडे सादर करण्याची जबाबदारी संबंधित नामनिर्देशित महिला व बालविकास अधिकारी यांची राहील.

शहरी क्षेत्रासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून आयुक्त, महानगरपालिका, अपर तहसिलदार, धुळे शहर, सर्व मुख्याधिकारी नगरपालिका, बाल विकास प्रकल्प नागरी (शहरी/ग्रामीण) यांचा नागरी भागासाठी समावेश राहील. या कक्षामार्फत अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका यांचेकडून तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचेद्वारे प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांचे अर्जाची स्विकृती, तपासणी, पोर्टलवर ऑनलाईन करण्याची जबाबदारी वार्ड ऑफीसर यांची राहील. प्राप्त अर्ज तीन दिवसाच्या आत पडताळणी, तपासणी करुन घेणे शहरातील वॉर्ड अधिकारी यांना बंधनकारक असेल. शहरातील वार्ड संख्येनुसार 5-10 वार्ड पर्यवेक्षण करणे कामी एक समन्वय अधिकारी याची नेमणूक करणे. समन्वय अधिकारी म्हणून सहा.आयुक्त अथवा अन्य समक्ष दर्जाचा अधिकारी यांची नेमणूक शहरातील तसेच वॉर्डातील लोकसंख्या व अपेक्षित अर्जांची संख्या विचारात घेऊन करावी. शहरातील सर्व वार्ड अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करुन प्राप्त झालेले अर्ज तपासून ठेवण्याची जबाबदारी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी धुळे शहर ) यांची राहील. महिला लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी वार्डनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करावे.

तसेच लाभार्थ्यांचे शुन्य बॅक खाते उघडणे, जुने बँक खाते सक्रीय करणे व आवश्यक तेथे आधारकार्ड लिंक करणे, नवीन व जुने बँक खाती ईकेवायसी करणेसाठी सर्व बॅक तसेच जिल्हा अग्रणी बँकेने सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते उघडले जातील याची दक्षता घ्यावी. जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, आपले सरकार सेवा केंद्र, यांनी महाईसेवा, संग्राम केंद्र सेतू चालक यांनी लाभार्थ्यांचे विविध प्रमाणपत्रासाठी प्राप्त झालेले अर्जावर तातडीने कार्यवाही करुन वरिष्ठ कार्यालयास पाठविणे तसेच ॲपबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी समन्वय करावे.

सर्व तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार, अव्वल कारकून, सामाजिक अर्थसहाय्य योजना (संजय गांधी/इंदिरा गांधी योजना) यांनी सामाजिक अर्थसहाय्य योजनेतंर्गत संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला लाभार्थ्यांची गावनिहाय तसेच मनपा, नगरपालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांची यादी गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपंचायत, आयुक्त महानगरपालिका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सादर करावी. जिल्हास्तरीय दैनिक अहवाल व कामकाज उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास (पथक प्रमुख) व सहायक म्हणून सखी वन स्टॉप सेंटर अंतर्गत जिल्हा महिला बालविकास अधिकारी ,धुळे कार्यालयातील कर्मचारी करतील. त्याचबरोबर या योजनेची व्यापक प्रसिद्धी जिल्हा माहिती अधिकारी करतील.

तरी जिल्ह्यातील गरजू माता-भगिनींनी जवळच्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांचेशी संपर्क साधून या योजनेविषयी अधिक माहिती घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.