आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

*विद्यार्थ्यांना कौशल्यासोबतच रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने*

 

जिल्हा प्रतिनिधी -: अरुण माधेशवार.

चंद्रपूर, दि. 24 ऑगस्ट: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे, सिमेंट कंपन्या व खाणी आहेत. त्यासोबतच काही खाजगी उद्योग व कंपन्यासुद्धा आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासते त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षण देतांना कौशल्यासोबतच रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार व कौशल्य विकासाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, गोंडवाना विद्यापीठाचे उत्तमचंद कांबळे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुशील बुजाडे, डब्लूसीएल, सीटीपीएस, जीएमआर व धारीवाल तसेच विविध उद्योगाचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे असल्याने चंद्रपूर सारख्या शहरात विशिष्ट कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या ठिकाणी कोळसा खाणी, औष्णिक विद्युत केंद्र, स्टील प्लांट, सिमेंट कंपन्या आहेत. या जिल्ह्यात चार प्रकारच्या विशिष्ट मनुष्यबळाची आवश्यकता भासते. येथील स्थानिकांना या उद्योगधंद्यांशी संबंधित कौशल्य नसल्याने त्यांना रोजगार मिळत नाही. त्या अनुषंगाने असे कौशल्य त्यांना मिळण्यासाठी प्रशिक्षण देणे हा मोठा उद्देश आहे. या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी व स्थानिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच प्रशिक्षण देता येईल.
जिल्ह्यातील उद्योगांनी विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी पुढाकार घ्यावा- डॉ. प्रशांत बोकारे
विद्यार्थ्यांना रोजगार देणे हे मूलभूत गरज आहे, असे सांगून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाचे कार्यक्षेत्र चंद्रपूर व गडचिरोली आहे. 75 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. विद्यार्थी शिक्षण घेवून बाहेर पडला की घरच्यांकडून अपेक्षा असते की रोजगार करावा पण रोजगार मिळत नसल्याने बरेचसे विद्यार्थी शेतीकडे वळतात. यासाठी उद्योगांनी पुढे यावे. विद्यापीठ आणि उद्योगांनी एकत्र आल्यास त्यांना लागणारे मनुष्यबळ निर्माण करता येईल. उद्योगांच्या अपेक्षा कळल्या तर आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता करता येईल. याशिवाय उद्योगांच्या आवश्यक गरजा लक्षात घेऊन त्या पद्धतीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देता येईल. त्यासोबतच या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल असे विविध कोर्सेस विद्यापीठात सुरू करता येईल. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देणे गरजेचे आहे त्यातून त्यांना शिकता येईल यासाठी त्यांना संधी देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील कोणत्याही विद्यार्थी रोजगाराशिवाय राहता कामा नये. विद्यापीठाकडून पूर्णपणे रोजगारासाठी प्रयत्न केले जात असून विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण, टॅली, फ्रंट व बॅक ऑफिससाठी लागणारे प्रशिक्षण आदीं प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी गोंडवाना विद्यापीठात इनक्युबेशन सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योगांनी विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर म्हणाल्या, जिल्ह्यात मोठया प्रमाणात इंडस्ट्रीज आहे या इंडस्ट्रीजमध्ये ट्रेंड मॅनपॉवरची समस्या नेहमी भेडसावत असते. विद्यार्थी तीन वर्षांमध्ये डिग्री घेऊन कॉलेजच्या बाहेर पडतो तेव्हा त्यांच्यामध्ये एम्प्लॉयबिलिटी कॉशन्स अत्यंत कमी असते. बहुसंख्या इंडस्ट्रीजमध्ये ट्रेंड मॅनपावरची कमतरता आहे यामध्ये ब्रिज करण्याची अत्यंत आवश्यकता आहे असे त्या म्हणाल्या.

गोंडवाना विद्यापीठाचे उत्तमचंद कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये सांगितले की, गोंडवाना विद्यापीठ आदिवासी भागामध्ये विभागलेले विद्यापीठ आहे. चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी हे विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. गोंडवाना विद्यापीठ शिक्षणासोबतच येथील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येईल यासाठी सतत प्रयत्नशील आहे. गोंडवाना विद्यापीठातर्फे आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले असून काही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले आहे. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख व जिल्ह्यातील सर्व उद्योग प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.