आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️अम्मा कि पढ़ाई उपक्रम उद्याचे अधिकारी घडविणारे केंद्र ठरेल : आ. किशोर जोरगेवार

▪️अम्मा कि पढ़ाई” उपक्रमाचा शुभारंभ, 284 विद्यार्थ्यांना मिळणार स्पर्धा परीक्षांचे मोफत शिक्षण..

 

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : मूल हुशार असते, त्यांच्यात जिद्दी असते, ते अधिकारी होण्याचं स्वप्न डोळ्यांत घेऊन जगत असतात. मात्र परिस्थिती, गरिबी, योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि आवश्यक साधनांची कमतरता यामुळे त्या स्वप्नांचा भंग होतो. मात्र आता अम्मा कि पढ़ाई केंद्र अशा विद्यार्थ्यांच्या पंखांना स्वप्नांची उडाण देणार आहे. आईच्या नावाने सुरु करण्यात आलेला हा उपक्रम कित्येक आईंची स्वप्नं पूर्ण करणारा ठरणार आहे. उद्याचे अधिकारी अम्मा कि पढ़ाई केंद्रातून घडतील, असे दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा संकल्प असून, हा उपक्रम उद्याचे अधिकारी घडविणारे एक सक्षम केंद्र ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला अम्मा कि पढ़ाई हा उपक्रम गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण आहे. या उपक्रमांतर्गत आर्थिक अडचणीमुळे स्पर्धा परीक्षेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निशुल्क, दर्जेदार व मार्गदर्शक शिक्षण देण्यात येणार आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.या प्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, जिल्हाधिकारी विनय गौडा, चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग, महसूल विभागाचे संजय पवार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, प्रा. राजेश दहेगावकर, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, दशरथसिंह ठाकूर, नामदेव डाहुले, संजय बेले, अजय जयस्वाल, कुणाल घोटेकर, राजू वेलंकीवार, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, आज इथे ‘अम्मा कि पढ़ाई’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उभं राहणं हे केवळ एका कार्यक्रमाचं उद्घाटन नाही, तर माझ्या आयुष्यातील खोल भावना व्यक्त करण्याचा क्षण आहे. आपल्या समाजातील गरीब, होतकरू, जिद्दी, मेहनती विद्यार्थ्यांचं स्वप्न अपूर्ण राहू नये, याच हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम मी माझ्या स्वतःच्या आईच्या नावाने आणि तिच्या प्रेरणेतून सुरू केला आहे. आमच्या घरीसुद्धा परिस्थिती कठीण होती. अशीच स्थिती हजारो घरांमध्ये आहे. त्या सर्व अम्मांसाठी आणि त्यांच्या लेकरांसाठी अम्मा कि पढ़ाई आहे. यामध्ये ३ हजार विद्यार्थ्यांपैकी चाचणी परीक्षा घेऊन २८४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यकतेनुसार मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यामध्ये मार्गदर्शन, चाचणी परीक्षा, नोट्स, आत्मविश्वास आणि शिस्तबद्ध अभ्यास यांचा समावेश आहे.
हा केवळ उपक्रम नाही, तर घराघरात शिक्षणासाठी झगडणाऱ्या आईंच्या त्यागाला दिलेली एक सलामी आहे. या उपक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र दीक्षाभूमी इथे असलेल्या महाविद्यालयात होत आहे, हे आमच्यासाठी गौरवाचं आणि अभिमानाचं आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षण आणि समतेच्या संदेशावर चालणारा हा उपक्रम त्यांच्या विचारांनाच वाहिलेली आदरांजली आहे, असेही आमदार जोरगेवार म्हणाले. या वेळी बोलताना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले की, आमदार किशोर जोरगेवार यांना त्यांच्या आईविषयी अपार श्रद्धा आहे. त्यांनी यापूर्वीदेखील अनेक उपक्रम आईच्या नावाने सुरू केले असून अम्मा कि पढ़ाई उपक्रम हे त्याचं एक प्रेरणादायी उदाहरण आहे.जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले की, हा उपक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे समाजात परिवर्तन घडेल. आमदार किर्तीकुमार भांगडिया म्हणाले की, किशोर जोरगेवार यांनी आधी मतदारसंघात अभ्यासिका सुरू केल्या आणि आता अम्मा कि पढ़ाई सुरू करून अभ्यासिका ते अधिकारी बनण्याचा प्रवास शक्य केला आहे.या कार्यक्रमात इंडियन एअर फोर्समध्ये निवड झालेल्या प्रणल जनबंधू यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अम्मा कि पढ़ाई केंद्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.