आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️वंचितांना न्याय मिळवून देण्यास शासकीय योजनांचा महामेळावा उपयुक्त् : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद..

मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभूळकर

धुळे, दि. 13 ( इंडिया 24 न्यूज ) : भारतीय संविधानाच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य नागरिकच आहे. या सर्वसामान्य नागरिकांसह वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा व महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन धुळेचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, व जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय सेवा व योजनांच्या महामेळावा आज पोलीस प्रशिक्षण केंद्र, जि. धुळे येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्धाटन न्या. मोहम्मद यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य किशोर काळे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर. डी. जोशी, जिल्हा सरकारी वकील ॲड. देवेंद्र तंवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद म्हणाले,

नागरिकांना कायद्याची माहिती व्हावी, त्यांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य कळावेत म्हणून न्यायालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले आहे. यामागील उद्देश म्हणजे न्यायालय आणि नागरिकांमधील संवाद वृध्दिंगत करीत पीडितांना न्याय मिळवून देणे हा आहे. नागरिकांनी आपापसातील किरकोळ वाद, तंटे सामंजस्याने सोडवावेत. त्यासाठी मोफत कायदेविषयक सेवा केंद्र असून या केंद्राच्या माध्यमातून विधी तज्ज्ञ नागरिकांना मार्गदर्शन करतात. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून महिला, गरीब नागरिकांना आता गावापासून ते देशाच्या राजधानीपर्यंत विधी सेवा केंद्राच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन मोफत मिळू लागले आहेत. समाजातील तळागाळातील घटकापर्यंत कायद्याची माहिती पोहोचविण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आहे. महिलांचा आदर करीत आपापसातील तंटे सामोपचाराने मिटवावेत.

त्याचबरोबर नागरीकांनी आपल्या न्याय हक्कासाठी कायद्याचा वापर करण्याचे आवाहन करतांना त्यांनी विविध दाखले दिलेत.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले, लाभाच्या योजनांपासून कोणताही घटक वंचित राहू नये याकरीता या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या युगात लाभ देणे व घेणे सोपे झाले आहे. याचा वापर करुन नागरीकांनी आपण ज्या योजनांसाठी पात्र ठरतो त्या योजनांची माहिती घेऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर मतदार यादीचा पुर्नरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे नवमतदारांनी याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त पात्र मतदारांनी नाव नोंदणी करण्याचेही आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी सांगितले की, प्रत्येक नागरीकाने आपला हक्क व कर्तव्याच्या भावनेतून शासकीय योजनांची माहिती घ्यावी. तसेच सुशिक्षित नागरीकांनी या योजनांची माहिती आपल्या परिसरातील नागरीकांना, नातेवाईक यांना द्यावी जेणेकरुन ते लाभ घेवू शकतील. पोलिस अधीक्षक श्री. बारकुंड म्हणाले, विधी सेवा प्राधिकरणाचा हा उपक्रम आदर्श आणि अनुकरणीय आहे. विधी प्राधिकरण, महसूल आणि पोलिस विभागाच्या समन्वयातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल, असे सांगितले.
वकील संघाचे अध्यक्ष ॲड. जोशी म्हणाले, समाजातील विषमता कमी करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण काम करीत आहे. नागरीकांनीही आपल्या कर्तव्याविषयी सजग राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे, उपवनसंरक्षक नितिन सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी एस. रुषिकेश रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विवेक नवले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, श्री. भाउसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांचेसह सर्व वरिष्ठ न्यायिक अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बालविवाह करणार नाही अथवा होवू देणार नाही याबाबतची प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच महापालिकेमार्फत पात्र लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेचे मंजुरी पत्र, कृषि विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेतंर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे तर महिला व बालविकास विभागामार्फत अनाथ बालकांना प्रमाणपत्र, दिव्यांग बांधवाना विविध योजनेच्या लाभाचे धनादेश, वैश्विक ओळखपत्र, बेबी केअर कीट तसेच माझी कन्या भागयश्री योजनेतंर्गत मुदतठेवीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस एकात्मिक बालविकास विभागाच्या वतीने आदिवासी टिपरी नृत्य सादर करुन मान्यवरांचे स्वागत केले. तर पोलीस बॅन्ड पथकाने देशभक्तीपर गीते सादर केली.
या महामेळाव्यात महसुल, पोलीस, जिल्हा परिषद, महापालिका, विधी सेवा प्राधिकरण यांचे विविध योजनांचे माहितीपूर्ण स्टॉल तसेच आपत्ती प्रतिसाद दल, शहरी आरोग्य अभियान, कृषि, शिक्षण, महिला व बालविकास, आदिवासी विकास विभाग, क्रीडा, परिवहन, वन, सामाजिक न्याय, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह महिला बचतगटांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला नागरीकांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. या महामेळाव्यास धुळेकर नागरीकांना उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.