▪️अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा.. समाजसेवक गजानन हरणे यांची मागणी..
▪️सततच्या पावसामुळे पिकांचे शंभर टक्के नुकसान; पंचनामे व तातडीच्या आर्थिक मदतीची गरज..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
अकोला – ( इंडिया 24 न्युज ) : दि. १९ ऑगस्ट : महिन्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. शेतजमिनी सतत पाण्याखाली राहिल्याने तूर, मुग, सोयाबीन, उडीद, कापूस यांसह खरीप हंगामातील सर्व पिके उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यातील शंभर टक्के पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी ठाम मागणी समाजसेवक गजानन हरणे ,संयोजक, निर्भय बनो जन आंदोलन यांनी केली आहे.
शेतकरी संकटात; शासनाकडे तातडीच्या मदतीची अपेक्षा
ऑगस्टपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. “जिल्हा प्रशासनाने तत्काळ शेतकऱ्यांच्या शेतीवर जाऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य व पुरेशी आर्थिक मदत द्यावी,” अशी मागणी हरणे यांनी केली.
प्रशासनाकडे लक्ष वेधणारी मागणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेल्या या मागणीला शेतकरी वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत असून जिल्हा प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.