▪️चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचा लोकार्पण क्षण आमच्यासाठी आनंदाचा – डॉ. प्रवीण पंत, एम.डी. (मेडिसीन), चंद्रपूर

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : औद्योगिक धुराच्या सावटात जगणारा, प्रदूषणाच्या चटक्यात सापडलेला चंद्रपूर जिल्हा गेल्या अनेक दशकांपासून केवळ विकासाच्या नव्हे, तर आरोग्याच्या गंभीर आव्हानांशीही झुंज देत आहे. श्वसनरोग, कर्करोगासारखे आजार प्रचंड बळावले आहे.एक डॉक्टर म्हणून रोजच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही जे दुःख जवळून बघतो, कधी ऐकतो ते प्रचंड हतबल करणारे आहे. अशा परिस्थितीत एखादा आशेचा किरण दिसणं हेच मोठं समाधान असतं.
तो आशेचा किरण आज वास्तवात उतरतो आहे.२८० कोटी रुपयांच्या खर्चातून उभं राहिलेलं अत्याधुनिक चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल. उद्या, २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण होत आहे, ही बातमी ऐकून एक डॉक्टर म्हणून मला मनापासून समाधान आणि अभिमान वाटला.
आजवर कॅन्सरग्रस्त रुग्णांना नागपूर, हैदराबाद, मुंबईसारख्या दूरच्या शहरांत पाठवावं लागत होतं. उपचारांचा खर्च, प्रवासाचा त्रास, कुटुंबाचं मानसिक खच्चीकरण..हे सगळं मी डॉक्टर म्हणून जवळून पाहिलं आहे. अनेकदा आजारापेक्षा व्यवस्था आणि अंतर रुग्णांसाठी अधिक घातक ठरत होतं. आज त्या वेदनांवर खऱ्या अर्थाने फुंकर घालणारी ही सुविधा चंद्रपूरमध्ये उभी राहत आहे, ही बाब केवळ ऐतिहासिक नाही, तर मानवी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे.
राजकारण म्हणजे केवळ निवडणुका जिंकणं किंवा सत्ता मिळाल्यावर घोषणा करणं नव्हे. समाजाच्या जखमा ओळखून, त्या जखमांवर दीर्घकालीन उपचार उभे करणं म्हणजेच खरे नेतृत्व. आ. सुधीर मुनगंटीवार हे अशा नेतृत्वाचे जिवंत उदाहरण आहेत.अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी अनेक विकासकामे केली; परंतु एक डॉक्टर म्हणून मला सर्वाधिक अंतर्मुख करणारे आणि भारावून टाकणारे काम म्हणजे हे कॅन्सर हॉस्पिटल. कारण हे काम केवळ निधी, फाईल्स किंवा इमारतीपुरते मर्यादित नव्हते,यात रुग्णांची वेदना, डॉक्टरांची हतबलता आणि कुटुंबांची आशा गुंतलेली होती.
सुधीरभाऊंना गोंडवाना विद्यापीठाने प्रदान केलेली डॉक्टरेट ही त्यांच्या सामाजिक जाणिवेची औपचारिक मान्यता आहे; पण चंद्रपूरचा डॉक्टर म्हणून मी ठामपणे सांगू शकतो की, माणसाच्या वेदनेवर फुंकर घालणारा डॉक्टर ते मनाने कायम होते. या रुग्णालयाच्या प्रत्येक विटेत त्यांची तळमळ, पाठपुरावा आणि मानवी संवेदना सामावलेली आहे.
हे रुग्णालय म्हणजे केवळ उपचार केंद्र नाही; हे रुग्णांसाठी आत्मविश्वास आहे.कुटुंबांसाठी दिलासा आहे.आणि डॉक्टरांसाठी योग्य उपचार देण्याची संधी आहे.अशा दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळेच चंद्रपूर आज आरोग्याच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे .आणि यासाठी एक डॉक्टर, एक नागरिक आणि एक चंद्रपूरकर म्हणून कॅन्सर हॉस्पिटलचा लोकार्पण क्षण आमच्यासाठी आनंदाचा आहे. याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
▪️एक चंद्रपूरकर म्हणून सुधीरभाऊ आपले खूप खूप धन्यवाद.



