◼️ मोहाडी (नले.) येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमुळे वाहतुकीची कोंडी ◼️ !! ग्रामस्थांची पार्किंग व्यवस्थेची मागणी !!

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही (इंडिया न्यूज): दि.१९/०२/२०२६
सिंदेवाही पासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहाडी (नले.) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेमुळे, मुख्य रस्त्यावर दिवसभर तीव्र वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सबंधित बँक ही गावातील वाहतुकीच्या प्रमुख मार्गावर भाड्याच्या जागेत सुरू असून, बँकेकडे स्वतंत्र पार्किंगची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
बँकेच्या कर्मचाऱ्यांची तसेच ग्राहकांची दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी केली जात असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. मोहाडी (नले.) हे तालुक्यातील मोक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे दिवसभर जड वाहतूक, बसेस आणि इतर प्रवासी वाहने सतत ये- जा करीत असतात, त्यामुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होते.
या मार्गावरून अंगणवाडीतील बालके, प्राथमिक शाळेचे विद्यार्थी तसेच आबालवृद्ध नागरिक ये-जा करीत असतात. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरत नाही. विशेषतः वृद्ध ग्राहकांना बँकेत ये जा करताना वाहतुकीत कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
बँकेच्या इमारतीतही पुरेशी जागा नसल्याने ग्राहकांना रस्त्यावरच थांबावे लागते. परिणामी, नागरिकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू असून, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळाने तात्काळ स्वतंत्र आणि प्रशस्त पार्किंग व्यवस्था असलेली जागा भाड्याने घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी, अशी मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर उपाययोजना करावी. अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.



