▪️कचरा येनापूरजवळील चांदेश्वर येथे गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यांची स्वच्छता न झाल्याने आरोग्याला धोका..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : कचरा येनापूरजवळील चांदेश्वर येथे गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यांची स्वच्छता न झाल्याने गावात आणि सांडपाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे डासांचा उपद्रव प्रचंड वाढला असून, स्थानिक नागरिक सध्या डेंग्यू आणि मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांच्या भीतीने ग्रासले आहेत. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने पूर्णपणे पाठ फिरविल्याचा आरोप करत, गावात तत्काळ
जंतुनाशक फवारणी मोहीम राबवावी, अशी संतप्त मागणी चांदेश्वर येथील नागरिकांकडून केली जात आहे.
नागरिकांकडून गोळा केलेला कर जातो कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चांदेश्वर परिसरातील मुख्य व अंतर्गत नाल्यांची गेल्या कित्येक महिन्यांपासून साफसफाई करण्यात आलेली नाही. नाल्यांमध्ये प्लास्टिक कचरा, गाळ आणि सांडपाणी साचून राहिल्याने नाल्यांना डबक्यांचे स्वरूप आले आहे. उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला असतानाही प्रशासनाने या नाल्यांचा उपसा केला नसल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून परिस्थिती बिकट होईल.
प्रशासनाला जाग कधी ?
गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे आणि डासांमुळे रात्रीची झोप उडाली आहे.. लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतने केवळ कागदोपत्री स्वच्छता न दाखवता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावे आणि गावात तत्काळ औषधी फवारणी करावी.
सध्याची गंभीर परिस्थिती पाहता ग्रामपंचायत प्रशासन आणि तालुका आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. चांदेश्वर येथील प्रमोद झरकर व नागरिकांनी प्रशासनाला चेतावणी दिली आहे की, जर येत्या दोन ते तीन दिवसांत नाल्यांची सफाई करून डास प्रतिबंधक धूर व औषधी फवारणी करण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.



