ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

झुंडीच्या सावलीत हरवणारी लोकशाही..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : लोकशाही म्हणजे फक्त निवडणूक जिंकणे नाही. ती जनतेच्या विश्वासाची शपथ असते. मतांच्या जोरावर मिळालेली सत्ता ही मालकी नसते, ती जबाबदारी असते. पण जेव्हा सत्तेच्या खुर्चीला अहंकाराची किनार लागते, तेव्हा कायद्यापेक्षा झुंड मोठी वाटू लागते आणि संविधानापेक्षा स्वतःचा शब्द अंतिम असल्याचा भ्रम निर्माण होतो.

काहींना वाटते, हाताशी काही तरुण असले, घोषणा देणारी गर्दी असली आणि विरोध करणाऱ्यांना दडपण्याची ताकद असली की लोकशाही जिंकली. प्रत्यक्षात त्या क्षणापासून लोकशाही हरू लागते. कारण कायद्यावर विश्वास ठेवणारा समाज कधीच झुंडशाहीचा पुरस्कार करत नाही.

आजचा तरुण अंधानुकरण करणारा नाही. तो प्रश्न विचारतो, कागदावरील विकास आणि प्रत्यक्षातील वास्तव यातील फरक ओळखतो. तो टाळ्यांपेक्षा हिशेब मागतो. त्यामुळे जनतेला आश्वासनांच्या भूलथापा देऊन कायम फसवता येईल, हा समज धोकादायक आहे.

सत्तेचा माज हा कायमस्वरूपी नसतो. इतिहास सांगतो—जनतेने डोक्यावर घेतलेल्यांनाच वेळ आल्यावर खाली उतरवले आहे. मतदार राजा शांत असतो, पण मुक नसतो. तो पाहतो, ऐकतो आणि योग्य वेळ आल्यावर मतपेटीतून निर्णय देतो.

म्हणूनच लोकप्रतिनिधींनी हे लक्षात ठेवावे—कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. झुंडशाहीने भीती निर्माण करता येईल; विश्वास नाही. दबावाने शांतता मिळेल; सन्मान नाही. सत्ता मिळवणे मोठे नाही, तर जनतेच्या मनात स्थान टिकवणे मोठे आहे.

लोकशाहीचा मार्ग संविधानातून जातो, झुंडीतून नाही. म्हणून सत्तेचा अहंकार सोडा, कायद्याचा सन्मान करा आणि जनतेला प्रतिस्पर्धी नव्हे तर मालक समजा. कारण शेवटी प्रत्येक सत्तेचा अंतिम निकाल न्यायालयात नव्हे, तर जनतेच्या न्यायालयातच लागतो.

सागर शंभरकर
नागभिड, चंद्रपूर
७०२०४५७५५६

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.