▪️झिंगानूरच्या शासकीय आश्रमशाळेत ‘वन महोत्सव’ उत्साहात; सीडबॉलद्वारे पर्यावरण जनजागृतीचा यशस्वी उपक्रम!

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ: उज्वल देवनाथ
सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि भावी पिढीमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण करण्यासाठी झिंगानूर वनपरिक्षेत्राच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक (DCF) श्री. नवकिशोर रेड्डी व सहाय्यक वनसंरक्षक (ACF) श्री. अक्षय मीना यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) श्री. प्रशांत नरेंद्र खैरनार यांच्या नेतृत्वात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, झिंगानूर येथे ‘वन महोत्सव’ चे औचित्य साधून सीडबॉल (बियांचे गोळे) प्रसारणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
*वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांचा विशेष संदेश :*
”वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून, ते आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेले निरंतर कर्तव्य आहे. आजच्या काळात वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे, त्यामुळे हिरवी जंगले वाचवणे आणि ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. सीडबॉल हे कमी खर्चात आणि दुर्गम भागात वेगाने वृक्षारोपण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच पर्यावरणाशी नाळ जोडली पाहिजे, जेणेकरून भविष्यात एक समृद्ध आणि हरित समाज निर्माण होईल. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून ते जगवले पाहिजे.”
— श्री. प्रशांत नरेंद्र खैरनार (वनपरिक्षेत्र अधिकारी, झिंगानूर)
*वन कर्मचारी व मजुरांकडून सीडबॉलची निर्मिती*
या मोहिमेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. प्रशांत खैरनार यांच्या सूचनेनुसार सर्व वन कर्मचारी आणि वनमजुरांनी मिळून विविध प्रकारच्या स्थानिक फळझाडांच्या बिया गोळा केल्या आणि त्याचे मोठ्या प्रमाणावर सीडबॉल (Seedballs) तयार केले.
*लहान मुलांचे कुतूहल आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण*
कार्यक्रमादरम्यान जेव्हा वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सीडबॉलचे प्रात्यक्षिक दाखवण्यास सुरुवात केली, तेव्हा उपस्थित लहान मुलांमध्ये या अनोख्या प्रयोगाबाबत प्रचंड कुतूहल व उत्सुकता दिसून आली. “माती आणि शेणाच्या गोळ्यातून झाड कसे उगवणार?” अशा अनेक प्रश्नांसह मुलांनी या प्रक्रियेची माहिती घेतली. वन कर्मचाऱ्यांनी मुलांच्या शंकांचे निरसन करून सीडबॉल कसे तयार करावेत, त्याचे महत्त्व काय आणि ते पर्यावरणासाठी कसे फायदेशीर ठरतात, याचे सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या आनंदाने व उत्साहाने हा उपक्रम समजून घेतला.
*दोन ते तीन हेक्टर पडीक जमिनीवर बीजरोपण*
प्रशिक्षणानंतर वन महोत्सवचे औचित्य साधून आश्रमशाळेच्या परिसरातीलच सुमारे २ ते ३ हेक्टर क्षेत्रफळाच्या मोकळ्या व पडीक जागेवर हे सर्व सीडबॉल टाकण्यात आले. येत्या पावसाळ्यात या सीडबॉलमधून मोठ्या प्रमाणावर फळझाडांची निर्मिती होऊन हा परिसर हिरवागार होईल, असा विश्वास वन विभागाने व्यक्त केला आहे.
*समाजसेवक, ग्रामस्थ व शिक्षकांची उल्लेखनीय उपस्थिती*
या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या वेळी समाजसेवक श्री. रामचंद्र कुमरी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि वन विभागाचे अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक व वन संरक्षक मजूर हजर होते. वन विभाग, शाळा आणि स्थानिक नागरिकांच्या या संयुक्त प्रयत्नांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.



