▪️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ..
गडचिरोलीत पत्रकार परिषदेत सरकारच्या शेतकरीहितैषी निर्णयांचे स्वागत.

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ
महाराष्ट्रातील शेतकरी, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतले असून, या निर्णयांचे स्वागत करत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
यासंदर्भात डॉ. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली येथील निवासी जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी, वीजबिल थकबाकी माफी, कृषी क्षेत्रातील विविध योजना तसेच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली.
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच पहिली कर्ज माफी श्री. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज मुक्ती योजना ही जवळपास ३८ हजार कोटींची कर्ज मुक्ती योजना महाराष्ट्राला दिली यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांपेक्षा अधिक व्यापक स्वरूपात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
*४८ हजार कोटींची वीजबिल थकबाकी माफ*
शेतकऱ्यांवरील आर्थिक संकटाचा मोठा भार कमी करणाऱ्या निर्णयांत शेतकऱ्यांची सुमारे ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिल थकबाकी माफ करण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. नेते यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज उपलब्ध होण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी शासनाने ठोस पाऊल उचलले आहे.
तसेच कृषी क्षेत्रासाठी वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या दिशेनेही शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
*‘मागेल त्याला शेततळे’सह जलयुक्त शिवाराला गती*
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’, जलयुक्त शिवार यांसारख्या योजनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. जलयुक्त शिवारामुळे शेतकरी वर्षातून दोन ते तीन पिके घेऊ लागला असून, उत्पादनवाढीसोबतच शेतीचा खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगण्यात आले.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन, डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडण्याचे कामही शासनाकडून सुरू आहे.
*शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय*
महिलांसाठी महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाची वीजमाफी व १२ तास वीजपुरवठा, पीकविमा, कृषी यांत्रिकीकरण, कृषी सिंचन यांसह विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे.
कापूस, कांदा, सोयाबीन यांसारख्या पिकांची शासनाकडून खरेदी करून शेतकऱ्यांना बाजारपेठेतील चढ-उतारापासून संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
“शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून शेतीला उद्योगाचा दर्जा देत आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची वाटचाल सुरू आहे,” असे डॉ. अशोकजी नेते यांनी सांगितले.
महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात अधिक सक्षम, समृद्ध व आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असून, शेतकरी हिताच्या या निर्णयांबद्दल महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच महायुती सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार, डॉ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद जी नरोटे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, कि.मो. प्रदेश सचिव रमेश भुरसे,प्रांत तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा भाजप नेते प्रमोद पिपरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीनजी कोडवते, डॉ. चंदाताई कोडवते, बांधकाम सभापती नगर परिषद तथा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर,जेष्ठ नेते डॉ. भारत खटी, महिला व बालकल्याण सभापती नगर परिषद तथा शहराध्यक्षा सीमा कन्नमवार, तालुकाध्यक्ष दत्तू सुत्रपवार,भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, कामगार आघाडी प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष विलास भांडेकर, जिल्हा सचिव तथा नगरसेविका वर्षा शेडमाके,शहर महामंत्री विनोद देवोजवार, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा महामंत्री सलिम शेख,बंडू झाडे,रमेश नैताम, संजयजी बारापात्रे,लोमेश कोलते, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत शासनाच्या विविध शेतकरीहितैषी योजनांची व निर्णयांची सविस्तर माहिती देत त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.



