▪️सावली तालुक्यातील पेडगावात वाघाचा हल्ला, ६० वर्षीय गुराख्याचा जागीच मृत्यू..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
सावली (पेडगाव) – ( इंडिया 24 न्युज ) : वाघांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाची आणखी एक थरारक घटना समोर आली आहे. सावली तालुक्यातील पेडगाव येथे वाघाने केलेल्या भीषण हल्ल्यात वासुदेव वाकुडकर (वय ६०) या गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव वाकुडकर हे काल नेहमीप्रमाणे गावालगतच्या जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्ला इतका अचानक आणि हिंसक होता की त्यांना आरडाओरडा करण्याचीही संधी मिळाली नाही. घटनास्थळीच त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर पेडगावसह संपूर्ण सावली तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. एका मेहनती आणि गरीब गुराख्याचा असा अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
गावात दहशतीचे वातावरण, वनविभागाला पाचारण
या घटनेमुळे पेडगाव, सावली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात, जंगलात जाण्यास नागरिक घाबरत आहेत.
ग्रामस्थांची मागणी आहे की, वनविभागाने तातडीने घटनास्थळी पिंजरा लावून नरभक्षक वाघाला जेरबंद करावे आणि मृतकाच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी.
घटनेची माहिती मिळताच सावली वनपरिक्षेत्राचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून वनविभाग यावर कायमस्वरूपी उपाययोजना कधी करणार? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.



