आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मोकाट जनावरांचा हैदोस; निष्पाप वासराचा बळी – जबाबदारांवर फौजदारी कारवाई होणार का?

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

नागभीड – ( इंडिया 24 न्युज ) : नागभीड शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत एका निष्पाप वासराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न किती गंभीर झाला आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच नगर परिषद नागभीडचे बांधकाम सभापती जे. पी. गजपुरे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मसराम यांना पाचारण करून जखमी वासरावर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र भरधाव वाहनाची धडक अत्यंत जबरदस्त असल्याने वासराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर नगर परिषद नागभीड प्रशासन घटनास्थळी पोहोचले. उपलब्ध टॅग क्रमांकाच्या आधारे जनावराच्या मालकाचा शोध घेण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार टॅग क्रमांक 103455765651 संदर्भातील नोंदीत संबंधित मालकाची माहिती उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. या माहितीची संबंधित विभागामार्फत अधिकृत पडताळणी करून पुढील कायदेशीर कार्यवाही अपेक्षित आहे.

दरम्यान, नगर परिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी रवी माहुले यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार मृत वासराचा ताबा घेऊन शव सुरक्षित ठेवले. सकाळी पंचनामा करून नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.

गोमाता आमची माता आहे… मग रस्त्यावर मोकाट का?

गोमातेची पूजा करणारे समाजात अनेक आहेत; परंतु त्याच गोमातेला आणि तिच्या वासरांना रस्त्यावर मोकाट सोडण्याची बेफिकिरी अखेर त्यांच्या जीवावर बेतत आहे. नागभीड शहरात गाय, बैल, बकऱ्या यांसारखी जनावरे मोठ्या प्रमाणावर मोकाट फिरत असल्याने नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

प्रशासनाला थेट प्रश्न : मोकाट जनावरांवर कायमस्वरूपी बंदी कधी?, संबंधित मालकाची जबाबदारी निश्चित करून फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार का?, नगर परिषद मोकाट जनावरे पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविणार का? , निष्पाप मुक्या प्राण्यांच्या मृत्यूची नैतिक व कायदेशीर जबाबदारी कोण स्वीकारणार?, गोमातेच्या नावाने भावना व्यक्त करण्यापेक्षा तिचे संरक्षण करणे हीच खरी जबाबदारी आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. जर जनावराच्या मालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडला असेल, तर संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून लागू असलेल्या कायद्यांनुसार कठोर कारवाई व्हावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.