▪️चंद्रपूर महानगरातील ३९० पैकी ३९० बूथवर ‘मन की बात’चे श्रवण..

संपादिका : सौ. शिल्पा बंनपुरकर
चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून ‘मन की बात’ जेन झी के साथ कार्यक्रमाचे आयोजन, भाजप महानगर कार्यालयासह सर्व बूथवर उत्स्फूर्त सहभाग
चंद्रपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय संवाद कार्यक्रमाचे रविवारी चंद्रपूर महानगरातील सर्व ३९० बूथवर सामूहिक श्रवण करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या चंद्रपूर महानगर कार्यालयासह महानगरातील ३९० पैकी ३९० बूथवर हा कार्यक्रम ऐकण्यात आला. महानगर कार्यालयात मन की बात जेन झी के साथ या आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत आयोजित या उपक्रमात विद्यार्थी, युवक, युवती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
‘मन की बात’ हा केवळ संवादाचा कार्यक्रम नसून देशातील सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेणारा आणि समाजातील सकारात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देणारा मंच आहे. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांशी संवाद साधत विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रनिर्मितीतील लोकसहभागाचे महत्त्व सांगतात.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’मधून देशातील सामान्य माणसाच्या असामान्य कार्याची ओळख संपूर्ण देशाला होते. समाजात अनेक व्यक्ती कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या परीने राष्ट्रनिर्मितीमध्ये योगदान देत असतात. अशा व्यक्तींच्या कार्याची दखल घेत त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून इतरांनाही समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते.
आजची जनरेशन झेन झी अर्थात नव्या पिढीमध्ये प्रचंड ऊर्जा, कल्पकता आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता आहे. या ऊर्जेला सकारात्मक दिशा मिळाली, तर देशाच्या विकासात तरुणांचे योगदान अधिक प्रभावी ठरू शकते. नव्या पिढीने देशाच्या परंपरा, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांशी जोडलेले राहून आधुनिक भारताच्या उभारणीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
चंद्रपूर महानगरातील सर्व ३९० बूथवर एकाच वेळी ‘मन की बात’चे श्रवण होणे हा कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि लोकसहभागातून जनसंवाद पोहोचविण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अशा उपक्रमांतून नागरिकांमध्ये सामाजिक जाणीव वाढण्यासह राष्ट्रहिताच्या कार्यासाठी प्रेरणा मिळते, असेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनसंवाद नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. भाजप महानगर कार्यालयासह शहरातील सर्व बूथवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने महानगरात व्यापक स्तरावर ‘मन की बात’चे श्रवण झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राज्य कार्यकारणी परिषद सदस्य तुषार सोम, जेष्ठ नेते प्रकाश देवतळे, महामंत्री शाम कनकम, युवा मोर्चा उपाध्यक्ष उपाध्यक्ष रघुवीर अहिर, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, नगरसेविका सविता कांबळे, जेष्ठ नेते पूनम तिवारी, सुरेश तालेवार, प्रमोद शास्त्रकार, अध्यक्ष विद्यार्थी आघाडी प्रलय म्हशाखेत्री, महानगर एस.आय.आर. प्रमुख सुमित बेले, प्रिन्स प्रसाद, रंजन ठाकूर, राकेश बोमनवार, छाया चवरे, रीना साखरकर, मनीषा पडगेलवार आदिंची उपस्थिती होती.



